Andheri bypoll Election : 16 ऑक्टोबर महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाची तारीख.. कारण याच तारखेला महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना दुपारच्य सुमारास राजकीय संस्कृतीची आठवण झाली.. निमित्त होतं ऋतुजा लटके यांची निवडणूक बिनविरोध करण्याचं.. आधी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. मग राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं. आणि संध्याकाळ होता होता शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. त्यामुळे निवडणूक लागल्यापासून ते अर्ज भरेपर्यंत कुणीही का बोललं नाही? आणि 16 तारखेला अचानक असं काय घडलं की राजकीय संस्कृतीची चिंता सर्वच राजकीय पक्षांना सतावू लागली. या प्रश्नांनी महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. कारण याआधी पंढरपुरात भारत भालकेंच्या निधनानंतर निवडणूक झाली. नांदेडमध्ये रावसाहेब अंतापूरकरांच्या निधनानंतर निवडणूक झाली. कोल्हापूरमध्ये चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर निवडणूक झाली. मग तेव्हा महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं काय झालं होतं..? अशा प्रश्नांचं मोहोळ उठलंय.


जे पंढरपुरात घडलं नाही, जे नांदेडमध्ये घडलं नाही , जे कोल्हापुरात घडलं नाही..ते अंधेरी पूर्वच्या निवडणुकीत का घडलं..? तर आता हे जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. किती मागे.. तर दसऱ्यापर्यंत. दसऱ्याला दोन मेळावे झाले. पहिला पारंपरिक शिवाजी पार्कवर.. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दुसरा बीकेसीवर.. बाळासाहेबांची शिवसेना अर्थात एकनाथ शिंदेंचा दोन्ही मेळाव्यात गर्दी, उत्साहानं टोक गाठलं होतं. आणि इथं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं की अंधेरीचा पहिला रणसंग्राम आपल्याला अत्यंत गांभीर्यानं लढायचा आहे. मग उमेदवार कोण? तर दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके, ज्या मुंबई महापालिकेवर क्लर्क म्हणून काम करतात. ज्यांनी पहिल्यांदाच आपण उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं जाहीर केलं होतं. आता ऋतुजा लटकेंनी निवडणूक लढवण्याची पूर्ण मानसिक तयारी केली. शिवसेनेचे अनिल परब आणि इतर नेत्यांवर त्याची जबाबदारी होती. त्यांनी 2 सप्टेबरला आपल्या नोकरीचा राजीनामाही दिला. 3 ऑक्टोबरला ऋतुजा लटके राजीनामा स्वीकारल्याचं पत्र घेण्यासाठी पालिकेत पोहोचल्या. पण राजीनामा विहित नमुन्यात नसल्यानं तो मंजूर करता येणार नाही असं लटकेंना सांगण्यात आलं. त्यांनी पुन्हा अर्ज केला. सगळ्या प्रक्रिया पार पाडल्या. एक महिन्याचं वेतन जमा केलं. आणि 30 दिवसात कधीही पालिकेला त्याबाबतचा निर्णय घेता येतो.. मात्र तो तातडीनं घ्यावा अशी विनंती केली. जी पालिकेनं फेटाळून लावली. त्यामुळे ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्हं निर्माण झालं. आणि एकनाथ शिंदे आणि भाजपच्या भूमिकेवर सेनेनं संशय घेतला.


ऋतुजा लटके आपला राजीनामा तातडीनं स्वीकारण्यात यावा म्हणून कोर्टात गेल्या. 13 ऑक्टोबरला सुनावणी सुरु असताना पालिकेच्या वकीलांनी सांगितलं की लटकेंच्या विरोधात लाच मागितल्याची तक्रार आहे. त्यांची विभागीय चौकशी सुरुय.. मग कोर्टानं ही तक्रार कधी आली असं विचारलं तर त्यावर उत्तर आलं की कालच म्हणजे 12 ऑक्टोबरला.अखेर कोर्टानं पालिकेला फटकारलं आणि लटकेंचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश दिले.. मग आता प्रश्न असा आहे की. ऋतुजा लटकेंना निवडणुकीपासून दूर ठेवण्याचं जे षडयंत्र झालं ते कुणामुळे? लटकेंचा राजीनामा स्वीकारला जाऊ नये म्हणून कोण प्रयत्न करत होतं? लटकेंच्या उमेदवारीचा एवढा धोका कुणाला वाटत होता..? लटकेंना कोर्टाची पायरी कुणी चढायला लावली? आणि दिवंगत आमदाराच्या पत्नीला निवडणूक लढवण्याची इच्छा असताना त्यांच्या रस्त्यात कोण आडवं उभं होतं..? त्यावेळी राजकीय संस्कृतीची आठवण महाराष्ट्रातल्या एकाही राजकीय पक्षाला का झाली नाही..? या प्रश्नांची उत्तरं कोण देणार? हा प्रश्न आहे..
 
आता पुढचा मुद्दा..ऋतुजा लटकेंनी अर्ज भरला.. आणि प्रचारही सुरु केला..  भाजपनं मुरजी पटेलांचा अर्ज शक्तीप्रदर्शन करत दाखल केला. मग भाजपचे मुंबई अध्यक्ष मनसेचा पाठिंबा मागण्यासाठी राज ठाकरेंकडे गेले. त्याचं कारण असंय की 2009 ला ला मनसेच्या संदीप दळवींना इथं 25 हजार मतं मिळाली होती. तेव्हा रमेश लटके केवळ 5 हजार मतांनी पडले होते. 2014 ला संदीप दळवींना इथं केवळ 9 हजार मतं मिळाली.. आणि रमेश लटके 5 सव्वापाच हजारांनी निवडून आले. त्यामुळे मनसेचा उमेदवार नसेल तर मराठी मतं मिळावीत म्हणून शेलारांनी राज ठाकरेंची भेट घेतली असावी. पण तिथेच राज ठाकरेंनी भाजपनं निवडणूक लढवू नये असा पवित्रा घेतला. त्याचं कारणही राज ठाकरेंनी दिलंय.. ते म्हणजे रमेश लटकेंचा प्रवास राज यांनी जवळून पाहिला होता. त्यांचे शिवसेनेत असल्यापासून लटकेंशी वैयक्तिक संबंधही होते. पण मग तेवढ्या एका कारणामुळे भाजपनं माघार घेतली का..? तर नाही. एकतर ही जागा शिवसेनेच्या वाट्याची. मग तत्वं म्हणून ती एकनाथ शिंदे गटानं लढवणं अपेक्षित होतं. ढाल तलवार या नव्या चिन्हासह..
कारण निवडणूक आयोगात शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह आणि पक्षाचं नाव गोठवण्यासाठी याच निवडणुकीचा दाखला देण्यात आला होता. त्यामुळे एकनाथ शिंदे गटानं हक्काची जागाही सोडली आणि पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवण्याचंही काम केलं.. असा प्रचार शिवसेनेकडून होणार हे स्पष्ट होतं. अर्थात उद्धव ठाकरे आणि त्यांचे सगळे सहकारी या सगळ्यामागे भाजपचा हात असल्याचं वारंवार आधोरेखित करतायत. त्यामुळे आधी ऋतुजा लटकेंना निवडणूक लढवू न देण्यासाठी झालेला आटापिटा त्यानंतर शिवसेनेची हक्काची जागा भाजपसाठी सोडल्याचा प्रचार झाला असता. दुसरं म्हणजे ही निवडणूक समजा ऋतुजा लटकेंनी जिंकली असती तर. शिवसेनेच्या केडरला मोठ्ठं बुस्टर मिळालं असतं. मुंबई महापालिकेआधी मूळ शिवसेनेचा मतदार जागचा हललेला नाही, असा प्रचार झाला असता. ज्यामुळे एकनाथ शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघात मुंबई महापालिकेत याचा परिणाम झाला असता. कारण अख्ख्या मुंबईभर नव्हे तर महाराष्ट्रभर उद्धव ठाकरे गटानं केला असता. आणि जरी ही निवडणूक ऋतुजा लटके हरल्या असत्या तरी भाजपनं एकनाथ शिंदेंच्या आडून डाव साधला. शिवसेनेच्या दिवंगत आमदाराच्या पत्नीला पराभूत केलं. मुंबई पालिकेतही अशाच पद्धतीनं एकनाथ शिंदेंचा वापर होणार असा प्रचार झाला असता. तुम्ही म्हणाल भाजपला पराभवाची भीती होती का...? तर मुळीच नाही.. कारण जसं ‘अंधेरीचा सामना कोण जिंकणार’ या एपिसोडमध्ये आपण बघितलंय की भाजपचे मुरजी पटेलही अंधेरी पूर्वमध्ये तितकेच स्ट्राँग आहेत. त्यांचा इथल्या मतदारांशी उत्तम कनेक्ट आहे. उत्तरभारतीय मतांचा आकडा 55 हजाराच्या घरात आणि गुजराती मतं 35 हजारांहून अधिक आहेत.शिवाय त्यांना कमळाचं चिन्हं नसताना गेल्यावेळी 45 हजार मतं मिळाली होती.. त्यामुळे ही निवडणूक ऋतुजा लटके आणि उद्धव ठाकरे गटासाठी केकव़ॉक नक्कीच नव्हती. मग तरीही भाजपनं या निवडणुकीतून माघार का घेतली... ?


 म्हणजे कोल्हापुरात चंद्रकांत जाधवांच्या निधनानंतर, नांदेडमध्ये रावसाहेब अंतापूरकरांच्या निधनानंतर आणि पंढरपुरात भारत भालकेंच्या निधनानंतर भाजपनं निवडणूक लढवण्याचं धाडस केलं.. राजकीय संस्कृतीचा विचार केला नाही. तेव्हाही काँग्रेसनं निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली होती. पण तसं झालं नाही. पण अंधेरी पूर्वमधून जी माघार घेतली त्यातून एक महत्त्वाची गोष्ट घडलीय. तीनही पक्षांसाठी म्हणजे भाजप, उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटासाठी झाकली मूठ सव्वालाखाची कायम राहिलीय. ऋतुजा लटकेंना आमदारकीचा रस्ता मोकळा करुन भाजपनं आम्ही ताकद असतानाही निवडणूक लढलो नाही हे आधोरेखित केलं. ऋतुजा लटके हरल्या असत्या किंवा जिंकल्या असत्या पण त्यातून मुंबईत जे निगेटिव्ह नॅरेटिव्ह सेट करण्याची संधी उद्धव ठाकरेंना मिळाली असती ती भाजपनं हिरावून घेतलीय. कदाचित या निवडणुकीत झाकली मूठ उघडली गेली असती तर त्याचे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गंभीर परिणाम झाले असते. आणि मुंबईत तर त्याचा खोलवर परिणाम झाला असता.. तो तूर्तास टाळला..मुंबई महापालिकेच्या मोठ्या लढाईसाठी भाजपनं दिलेली ही छोटी कुर्बानी आहे..इतिहासात आपण चर्चिलनी घेतलेली डंकर्कची यशस्वी माघार शिकलो आहोत..प्रत्येकवेळी जिंकण्यासाठी लढून रक्तच सांडावं असं नाही.. तर काही लढाया माघार घेऊनही जिंकता येतात..राजकीय संस्कृती वगैरे राजकीय पक्षांची केवळ सोय आहे..तसं नसतं तर एवढं महाभारत घडलंच नसतं.