Pandharpur: भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी 32 वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून 7 मजली दर्शन मंडप बांधण्यात आले होते. मात्र आता पुन्हा जवळपास 20 कोटी रुपये खर्चून हे  दर्शन मंडप जमीनदोस्त करण्याचा प्रस्ताव पंढरपूर (Pandharpur) विकास आराखड्यामध्ये आल्यानंतर आता याच्या  विरोधात वारकरी संप्रदाय देखील आक्रमक झाला आहे. भाविकांच्या देणगीतून उभारलेल्या या वास्तूला जमीनदोस्त न करता त्या ठिकाणी तिरुपतीच्या धर्तीवर दर्शन रांगेतील भाविकांसाठी प्रतीक्षा हॉल बनविण्याची मागणी वारकरी नेत्यांकडून येऊ लागली आहे. यापूर्वी मंदिर समितीचेसह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी देखील वास्तू पाडण्यास विरोध दर्शविला होता. 


खरेतर भाविकांच्या पैशातून कोट्यवधी रुपयाची उधळपट्टी करून ही निरुपयोगी वास्तू उभारल्याचे सांगत वारकरी संप्रदाय पूर्वीपासून विरोध करीत आला आहे. या दर्शन मंडपात भाविकांना सात मजले चढून पुन्हा सात मजले उतरत विठुरायाच्या दर्शनासाठी यावे लागत होते. वृद्ध भाविकांना यामुळे नेहमीच त्रास होऊ लागल्याने या वास्तूचा फक्त एक मजला वापरात ठेवण्यात आला होता. आता नवीन आराखड्यात जवळपास 50 कोटीची ही वास्तू जमीनदोस्त करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली असून यासाठी सुद्धा पुन्हा कोट्यवधी रुपये खर्च होणार आहेत. 


आता ही वास्तू पडण्यापेक्षा याच वास्तूमध्ये दुरुस्ती करून प्रत्येक मजल्यावर प्रतीक्षा हॉल केल्यास हजारो भाविकांना दर्शन रांगेसाठी 10 - 10 किलोमीटर उन्ह पावसात उभे राहावे लागणार नसल्याची भूमिका वारकरी पाईक संघाचे रामकृष्ण महाराज वीर यांनी घेतली आहे. याच पद्धतीने संत नामदेव महाराजांचे वंशज निवृत्ती महाराज नामदास यांनीही पंढरपूर मध्ये तिरुपतीच्या धर्तीवर टोकं व्यवस्था सुरु करून याचं दर्शन मंडपाचा वापर करावा अशी मागणी केली आहे.


वास्तविक आता या 32 वर्षांपूर्वीच्या वास्तूत बदल करून येथे तिरुपतीच्या धर्तीवर प्रतीक्षा हॉल बनविण्यासाठी शासनाने आयआयटी येथील तज्ज्ञांच्या मदतीने संपूर्ण इमारतीची तपासणी करून घ्यावी लागेल. या वास्तूत दुरुस्ती करताना कोणता धोका न होता अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून नेमके कोणते बदल करता येतील, याची माहिती आता प्रथम विकास आराखडा बनविणाऱ्या अधिकाऱ्यांनी घ्यावी आणि ती वस्तुस्थिती वारकरी संप्रदायासमोर मांडावी, तरच या वादातून मार्ग निघेल अन्यथा प्रशासन विरुद्ध वारकरी संप्रदाय या वादात वारकऱ्यांसाठी बनविला जाणार विकास आराखडा अडकून पडेल.