मुंबई : शहरी नक्षलवाद आणि भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी मंगळवारी तपास यंत्रणेनं मुंबईत प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना अटक केली. सर्वोच्च न्यायालयानं दिलेली मुदत संपताच तेलतुंबडे हे मुंबईतील एनआयए मुख्यालयात दुपारी दिडच्या सुमारास तपास यंत्रणेपुढे शरण आले. त्यानंतर तिथंच त्यांना अटक करून दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मुंबई सत्र न्यायालयातील एनआयए कोर्टात त्यांना हजर करण्यात आलं. विशेष कोर्टाचे न्यायाधीश ए.टी. वानखेडे यांनी तेलतुंबडे यांना 18 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. माओवादी तसेच दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून वादाच्या भोवऱ्यात अडकलेले सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना अटकपूर्व जामीन देण्यास हायकोर्टानं 14 फेब्रुवारी 2020 रोजी नकार दिला होता. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी अवधी मिळावा याकरता दोघांना चार आठवड्यांसाठी अटकेपासून दिलासा दिला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयानंही या दोघांचं अपील फेटाळून लावत त्यांना 14 एप्रिलपर्यंत तपास यंत्रणेपुढे शरण होण्याचे निर्देश दिले होते. गौतम नवलखा हे दिल्लीत एनआयएपुढे शरण आले असून त्यांना बुधवारी दिल्लीतील कोर्टात हजर केलं जाईल.
शहरी नक्षलवाद आणि भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे या दोघांविरोधात पुणे पोलिसांनी दाखल केलेली कागदपत्रे ही तपासलेली नाहीत. तसेच पुणे पोलिसांनी अद्याप त्यांचा यासंदर्भात दोघांचा साधा जबाब देखील नोंदवलेला नाही. मुळात या प्रकरणाशी यांचा काहीही संबंधच नाही असा युक्तीवाद दोघांच्या वतीने कोर्टात केला गेला. गौतम नवलखा हे काश्मिरमध्ये सत्य शोधन समितीच्यावतीने गेले होते. तेव्हा तिथं त्यांचा हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संपर्क आला होता. मात्र हा आरोप बिनबुडाचा असून नवलखा हे सरकारच्यावतीने शांतता दूत म्हणून काम पाहत होते. त्यामुळे ते माओवाद्यांमध्ये फारसे प्रसिद्ध नव्हते असाही दावा कोर्टात करण्यात आला होता.
मात्र हे दोघेही एल्गार परिषदेशी संबंधित असून भीमा-कोरेगाव प्रकरणात यांच्या सहभागाबाबतही अनेक पुरावे उपलब्ध आहेत. त्याबाबत चौकशी आणि अधिक तपास सुरू असल्य्यामुळे त्यांचा ताबा मिळवून अधिक चौकशी गरजेची असल्याचं एनआयएनं कोर्टात सांगितलं. शहरी नक्षलवाद प्रकरणी अटकेत असलेल्या रोना विल्सन आणि सुरेंद्र गाडलिंग या इतर आरोपींकडून जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावाद्यांशी संबंध जोडलेली अनेक कागदपत्र जप्त केली आहेत. त्यात या सर्व आरोपींनी हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंध कसे ठेवले आहेत याचा उल्लेखही या कागदपत्रातून करण्यात आला असल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे. तसेच आनंद तेलतुंबडे हे प्रतिबंधित नक्षलवादी संघटनेचे सक्रिय सदस्य असून अशा संस्थांमध्ये लोकांची भरती करणे आणि या संस्थांसाठी निधी गोळा करण्याचे कामही ते पाहत असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
Anand Teltumbde | प्राध्यापक आनंद तेलतुंबडे तपासयंत्रणेला शरण