मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावाचं पालकत्व अमृता फडणवीसांकडे!
एबीपी माझा वेब टीम | 14 Sep 2016 09:54 PM (IST)
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पतीच्या खांद्यावरील काही भार आपल्या खांद्यावर घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावाचं पालकत्व अमृता फडणवीस यांनी स्वत:कडे घेतलं आहे. अमृता फडणवीस यांनी मंगळवारी संध्याकाळी फेटरी गावाला भेट दिली. गावातील लोकांशी आणि सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. गावाच्या गरजा जाणून घेतल्या आणि लवकरच या गावाचा आदर्श गाव बनवू असा निर्धारही व्यक्त केला. महत्त्वाचं म्हणजे अमृता फडणवीस यांनी गावकऱ्यांना विश्वास दिला की, त्या स्वत: या गावात दर महिन्याला एक किंवा दोन वेळा भेट देतील. तसंच दर आठवड्याला त्यांची तयार केलेल्या टीममधील कोणतरी एखादी व्यक्ती गावकऱ्यांना भेटेल. त्यामुळे गावकऱ्यांनी त्यांच्या काय अडचणी आहेत, ते संबंधित व्यक्तीला सांगाव्यात.