औरंगाबाद : मराठा मोर्चा आणि विनायक मेटेंचा काहीही संबंध नाही. त्यामुळे विनायक मेटेंनी मोर्चाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला तर योग्य उत्तर देऊ, अशी अशी भूमिका तब्बल 12 मराठा संघटनांनी घेतली आहे. औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी शिवसंग्रमाचे नेते आणि आमदार विनायक मेटेंवर निशाणा साधला आहे.
विनायक मेटेंनी काल पुण्यात पत्रकार परिषद घेऊन मराठा मोर्चाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला होता. मराठा समाजाचे मोर्चे हे दलितविरोधी नाहीत. त्यामुळे दलितांनी प्रतिमोर्चे काढू नये. मराठा समाजाचा मोर्चा हा कोणत्याही पक्षाचा किंवा नेत्याचा नाही. तसंच हे मोर्चे राष्ट्रवादी पुरस्कृत मोर्चे आहेत, असं भाष्य करणारे चुकीचे आहेत. हे मोर्चे दलितांविरोधात असल्याचा सूर माध्यमांमध्ये आहे, पण तो बरोबर नाही, असं मेटे म्हणाले होते.
यानंतर आता मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. 12 मराठा संघटनांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन विनायक मेटेंवर टीकास्त्र सोडलं. मेटेंनी मोर्चांचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांना योग्य उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.