नागपूर : बांगड्या भरा विधानावरुन देवेंद्र फडणवीसांनी माफी मागावी, अशी मागणी करण्याचा आदित्य ठाकरेंना काहीही अधिकार नाही. अशा शब्दात अमृता फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. अमृता फडणवीसांनी एबीपी माझा डिजिटलला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत अनेक मुद्द्यांना हात घातला. देवेंद्र फडणवीसांची पत्नी असल्यानं मी ट्रोल होते. मात्र ट्रोलिंग झाल्यानंतर मला रणांगणात असल्यासारखं वाटत असं परखड मत अमृता फडणवीसांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केलं. आपल्याकडे कोणत्याही नेत्याची बायको व्यक्त होत नाही. मात्र, मी झाले त्यामुळेच कदाचित मला ट्रोल करण्यात आलं. आजवर मी जे काही बोलले ते मी केवळ अमृता फडणवीस म्हणूनच बोलले आहे. देवेंद्र फडणवीस यांची पत्नी, एक बँकर किंवा भाजपची समर्थक म्हणून मी बोलत नाही तर स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून मी बोलते, असं त्या म्हणाल्या.


'या' मुलानं देवेंद्रजींना माफी मागायला लावणं आवडलं नाही

देवेंद्र फडणवीस यांना आदित्य ठाकरेंनी माफी मागायला लावणं आपल्याला आवडलं नाही. त्यामुळं आदित्य ठाकरेंवर ट्विटरवरुन व्यक्त झाले, असं त्यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बांगड्यांबाबत केलेलं वक्तव्य ही एक म्हण आहे. या वाक्यावरुन त्यांना महिलांचा अपमान करायचा नव्हता. कारण, एक महिला म्हणून केवळ मीच देवेद्र फडणवीस यांना चांगलं ओळखते. त्यांनाही माझ्याबाबत आदर आहे, त्यामुळे ते नेहमीच माझ्या पाठीशी उभे असतात. मात्र, अशा व्यक्तीला या मुलानं (आदित्य ठाकरे) माफी मागायला लावणं मला पटलं नाही त्यामुळं मी त्यांना उत्तर दिलं, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

रश्मीजी घरच्या चुका लपवू नका

अनेकदा मी सोशल मीडियातून व्यक्त झाले आहे. त्यामुळे मला जे वाटतं ते मी बोलते. मग परिणामांचा विचार करत नाही. आदित्य ठाकरेंना रेशीम किड्याची उपमा देताना मला रश्मी ठाकरेंबाबत बोलायचं नव्हतं. मात्र, त्याबाबतही चुकीचं पसरवण्यात आलं, असं अमृता फडणवीस यांनी स्पष्ट केलं. सामनाच्या संपादिका झाल्याबद्दल रश्मी ठाकरेंना अमृता फडणवीस शुभेच्छा दिल्या तसेच एक सल्लाही दिला. वर्तमानपत्राच्या संपादकाचं काम निष्पक्ष राहणं असतं. त्यामुळे तुम्ही बाहेरच्यांच्या चुका सामनातून पुढे आणा पण घरच्या चुका लपवू नका, असं त्या म्हणाल्या.

माझी कामं पूर्वीप्रमाणेच सुरु
अमृता फडणवीस म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मी जशी होते तशीच आजही ते विरोधी पक्ष नेते असताना आहे. मी काही ठिकाणी व्यक्त झाले. त्यामुळे लोकांना असं वाटतंय की मला राजकारणात यायची इच्छा आहे. मात्र, मला राजकारणात यायची इच्छा नाही. मात्र, मी माझे सामाजिक कार्य करत राहणार आहे. माझी कामं पूर्वीप्रमाणेच सुरु आहेत. पण मधल्या काळात लोकं कशी बदलतात कशी विश्वासघात करु शकतात हे मी जवळून पाहिलं आहे. त्यामुळे आता मला लोक कळायला लागले आहेत, असं त्या म्हणाल्या.

अजित पवार प्रति मुख्यमंत्री

यावेळी अमृता फडणवीस यांनी अजित पवार यांना देखील टोला लगावला. अजित पवारांबाबत आनंद वाटतो. कारण ते आधी भाजपासोबत सरकार स्थापन करीत उपमुख्यमंत्री झाले होते, आता प्रतिमुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असं त्या म्हणाल्या.