Amruta Fadanvis Tweet: पहाटेचा शपथविधी ते दुपारचा शपथविधी असा प्रवास करत अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर अनेकांना पहिला आठवला तो पहाटेचा शपथविधी. यावर बऱ्याच प्रतिक्रिया देखील समोर आल्या आहेत. मात्र यावर अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांची 'ती' प्रतिक्रिया लक्षवेधी ठरली आहे. अमृता फडणवीस यांनी थेट  2019 सालचे ट्विटच रिट्विट केले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील या घडामोडींमध्ये अमृता फडणवीस यांनी तिच प्रतिक्रिया कायम ठेवली आहे. 


नेमकं काय आहे अमृता फडणवीस यांचं ट्विट?


साल 2019. पहाटेला राजभवानात महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींची नांदी झाली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राजकारणात पहिला भूकंप झाला. यावर बऱ्याच प्रतिक्रिया देखील आल्या होत्या. तेव्हा अमृता फडणवीस यांनी देखील ट्विट करत प्रतिक्रिया दिली होती. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे अभिनंदन करत त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता. 


रविवार 2 जुलै 2023 रोजी या राजकीय घडामोडींमधील आणखी एक प्रयोग पूर्ण झाला आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण अमृता फडणवीसांनी मात्र त्यांचे 2019 सालचे ट्विटच रिट्विट केले आहे. त्यामुळे आजच्या घडामोडींवर अमृता फडणवीस यांना शब्दच सापडत नसल्याच्या चर्चा आता सोशल मिडियावर रंगू लागल्या आहेत. 






अजित पवारांच्या शपथविधीवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विट करत अजित पवार आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आठ आमदारांचे अभिनंदन केले आहे. परंतु अजित पवारांच्या या बंडाला राष्ट्रवादीचा कोणताही पाठिंबा नसल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या अगदी दिग्गज नेत्यांच्या फळीचा या बंडामध्ये समावेश आहे. छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे,  अदिती तटकरे या नेतेमंडळींचा समावेश आहे. 


शरद पवारांनी मात्र या बंडाला पाठिंबा नाकारत राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याचं स्पष्ट केलं आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आता ट्रिपल इंजिनचं सरकार आल्याचं म्हटलं आहे. अजित पवारांच्या या बंडावर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. पण यावर आता राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाची पुढची भूमिका काय असणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. 


हे ही वाचा :