सांगली : ज्या व्यक्तीच्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्याला शरद पवार गेले त्याच व्यक्तीला आपल्या भाषणात राज्य सहकारी साखर कारखाना फेडरेशनच्या अध्यक्षपदाची ऑफर देण्याचं चातुर्य त्यांनी दाखवलं आहे. इस्लामपूरच्या राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे पी. आर. पाटील यांच्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्यानिमित्त शरद पवार यांनी वाळवा तालुक्यातील कुरळपमध्ये अभिष्टचिंतन कार्यक्रमाला हजेरी लावली. याच कार्यक्रमात बोलताना पवारांनी राज्य सहकारी साखर कारखाना फेडरेशनच्या अध्यक्षपदाची ऑफर पी. आर. पाटील यांना दिली. तसेच, पाटील यांनीदेखील आपण ही जबाबदारी देत असाल तर, अवश्य निष्ठेने स्विकारू असा पवारांना शब्द दिलाय. यावेळी 51 वर्षे सहकारी कारखान्याचे संचालकपद आणि 25 वर्षे अध्यक्षपद सांभाळणं ही काही सोपी गोष्ट नाही, पण पी. आर. पाटलांनी ही जबाबदारी लिलया सांभाळली आहे, असं शरद पवार भाषणात म्हणाले आहेत.
"मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जयप्रकाश दांडेगावकर यांची राज्य सहकारी साखर कारखाना फेडरेशनच्या अध्यक्षपदाची मुदत संपत आहे. या रिक्त होणाऱ्या जागेवर पी. आर. पाटील यांची नेमणूक व्हावी, असे जयप्रकाश दांडेगावकर यांनी मला सुचवलं असल्याचं शरद पवार म्हणाले. पी. आर. पाटील यांच्यासारखा अध्यक्ष राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाला लाभला तर सर्वच साखर कारखानदारांना एक नवी दृष्टी मिळेल. त्याचा फायदा शेतकऱ्यांना आणि कारखानदारांना होईल, याची मला खात्री आहे." असंही शरद पवार भाषणात म्हणाले.
"पी. आर. पाटील यांच्या सार्वजनिक जिवनाची सुरुवात राजारामबापू पाटील यांच्यासोबत झाली. राजारामबापूंनी तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचे काम आयुष्यभर केले. राजाराम बापू म्हणजे कार्यकर्ते निर्माण करण्याची जणू फॅक्टरीच अशा शब्दांत पवार यांनी राजाराम बापूच्या कार्याला उजाळा दिला. राजारामबापूंनी घडवलेले कार्यकर्ते आजही महाराष्ट्राच्या विविध भागात उत्तम काम करत आहेत,त्यातील एक म्हणजे, पी. आर. पाटील आहेत." असं शरद पवार म्हणाले.
"सलग 51 वर्षे सहकारी कारखान्याचे संचालकपद आणि 25 वर्षे अध्यक्षपद सांभाळणे ही काही सोपी गोष्ट नाही. माझी संसदेत 52 वर्षांची कारकीर्द पूर्ण झाली आहे, पण एखाद्या सहकारी कारखान्यावर कुणी 51 वर्षे बसू देईल, असं मला वाटत नाही. मात्र पी. आर. पाटील यांनी ही असाध्य गोष्ट साध्य करुन दाखवली आहे, असं म्हणत पवारांनी पी. आर. पाटील यांच्या सहकारी क्षेत्रातील अभ्यासाचं आणि कामाचं कौतुक केलं. "पी. आर. पाटील हे महाराष्ट्रातील एक उत्तम कारखाना चालवत आहेत. आपल्यापैकी अनेकांनी साखर कारखाने काढले. मात्र त्यात प्रयोगशीलता वा नाविन्य आहे का? हा विचार करायला हवा. पण पी. आर. पाटील यांनी सातत्यानं नवनवीन प्रयोग करत उत्तमरित्या राजारामबापू सहकारी साखर कारखाना चालवला आहे." असं म्हणत बाकीच्या कारखानादारांनी देखील आता सीएनजी गॅस निर्मित करावा असा सल्ला शरद पवार यांनी दिला.
दरम्यान, या कार्यक्रमास जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार धैर्यशील माने यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुमनताई पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख, काँग्रेस भाजपाचे माजी आमदार मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते.