Shivshahir Babasaheb Purandare Passed Away : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात आज निधन झालं. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. काही दिवसांपुर्वी बाबासाहेब पुरंदरेंना घरात पाय घसरून पडल्याने इजा झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे एक पर्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. ते 100 वर्षांचे होते. साडे आठ वाजता पार्थिव पर्वती इथल्या निवासस्थानी ठेवण्यात आलं आणि सकाळी साडेदहा वाजता शासकीय इतमामात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
रविवारी, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना बाबासाहेबांना न्यूमोनिया झाला असून त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती अधिकृतपणे रुग्णालयाच्यावतीनं देण्यात आली होती. मात्र, रुग्णालयात मृत्यूशी सुरु असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली. बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ नाव बळवंत मोरोपंत पुरंदरे होते. त्यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी झाला. त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी, आदराने त्यांना बाबासाहेब पुरंदरे असे म्हटले जाऊ लागले. जवळपास सात दशके त्यांनी इतिहास संशोधनाचे कार्य केले. पहिल्यांदा ते 1941 मध्ये भारत इतिहास संशोधक मंडळात सहभागी झाले होते. इतिहाससंशोधक ग. ह. खरे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले होते. पुणे विद्यापीठाच्या 'मराठा इतिहासाची शकावली- सन 1740 ते 1764' या भारत इतिहास संशोधन मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात बाबासाहेब पुरंदरे संशोधक म्हणून सहभागी झाले होते.
पाहा व्हिडीओ : एका पर्वाचा अस्त!
महाराष्ट्र सरकारने त्यांना सन 2015 मध्ये राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'महाराष्ट्र भूषण' देऊन गौरव केला होता. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला होता. इतिहास संशोधनात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्रावर देश-विदेशात सुमारे 12 हजारांपेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत.
बाबासाहेब पुरंदरे यांची साहित्य संपदा
बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन केले. त्याशिवाय, ललित कादंबरी लेखन, नाट्यलेखनही केले. 'जाणता राजा' या ऐतिहासिक गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन केले. 'सावित्री', 'जाळत्या ठिणग्या', 'मुजऱ्याचे मानकरी', 'राजा शिवछत्रपती', 'महाराज', 'शेलारखिंड', 'पुरंदऱ्यांचा सरकारवाडा', 'शनवारवाड्यातील शमादान', 'शिलंगणाचं सोनं', 'पुरंदरच्या बुरुजावरून', 'कलावंतिणीचा सज्जा', 'महाराजांची राजचिन्हे', 'पुरंदऱ्यांची नौबत' आदी साहित्य प्रकाशित झाले आहे. राजा शिवछत्रपती या ग्रंथाच्या 16 आवृत्ती प्रकाशित झाल्या असून 5 लाखांहून अधिक प्रती प्रकाशित झाल्या आहेत.
बाबासाहेब पुरंदरेंबद्दल थोडक्यात :
- पूर्ण नाव- बळवंत मोरेश्वर पुरंदरे तथा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
- पुण्याजवळच्या सासवडमध्ये 29 जुलै 1922 रोजी जन्म
- पुण्यातल्या भारत इतिहास संशोधक मंडळासोबत त्यांनी इतिहास संशोधक म्हणून काम सुरु केलं
- 2015 सालापर्यंत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर बारा हजारांहून अधिक व्याख्याने दिली
- महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा, मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तावेजांचा सखोल अभ्यास केला.
- जाणता राजा महानाट्याचे निर्माते, दिग्दर्शक
- वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन, नाट्यलेखन
- राजा शिवछत्रपती, पुरंदऱ्यांची दौलत, पुरंदऱ्यांची नौबत, शेलारखिंड हे साहित्य प्रकाशित
- वयाच्या सहाव्या वर्षांपासून वडिलांच्या बरोबर किल्ले, वाडे, महाल, मंदिरे पाहण्यास प्रारंभ केला.
- कधी सायकलवरून, कधी पायी, कधी रेल्वेने, कधी जलमार्गाने लक्षावधी मैलांचा प्रवास
- 2015 साली महाराष्ट्रभूषण तर 2019 साली पद्मविभूषण पुरस्कार
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Babasaheb Purandare : एका पर्वाचा अस्त! शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन
- Babasaheb Purandare : ब मो पुरंदरे ते शिवशाहीर बाबासाहेब, जाणून घ्या कसं होतं बाबासाहेबांचं आयुष्य...
- शिवचरित्र कसं घडलं? बाबासाहेबांनी माझा कट्ट्यावर सांगितला होता लेखन प्रवास
- Babasaheb Purandare : शिवप्रेमी बाबासाहेबांच्या मनात राहिली 'ही' सल, माझा कट्ट्यावर व्यक्त केली होती खंत