अमरावती : मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना (CoronaVirus) रुग्णांचा आकडा अतिश वेगानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागांपासून ते अगदी शहरी भागांपर्यंत रुग्णसंख्येचा हा आलेख उंचावताना दिसत आहे. याच परिस्थितीमध्ये आता प्रशासनही सतर्क झालं असून, राज्य शासन आणि स्थानिक प्रशासकीय यंत्रणा पुन्हा एकदा कोरोनाच्या संसर्गाला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील झाल्या आहेत.


सर्वसामान्य नागरिकांना मागील काही महिन्यांमध्ये कोरोनासंदर्भातील अनेक नियमांत शिथिलता दिल्यानंतर आता चित्र आणखी भयावह होत असल्याचं पाहून राज्यातील अमरावती जिल्ह्या प्रशासनानं काही कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं कोरोना रुग्णांची वाढ झाल्याची नोंद अमरावतीमध्ये करण्यात आली.

बुधवारी इथं, दिवसभरात तब्बल 498 कोरोना रुग्ण आढळले, तर, 6 कोरोनाबाधितांचा मृत्यू, जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या 26 हजार 726वर पोहोचली आहे.

कोरोना रुग्णवाढीनं पुन्हा एकदा वेग पकडल्यामुळं आता जिल्ह्यात पुन्हा अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी  शैलेश नवाल यांच्या आदेशानुसार प्रवाश्यांनी मास्क न वापरल्यास याची शिक्षा म्हणून वाहतुकदाराला पाच हजार रुपयांचा दंड लागू करण्यात येणार आहे. तर कोरोना प्रतिबंधात्मक नियमाचं पालन न करणाऱ्या दुकानांना १० हजार दंड ठोठावण्यात येणार असून, त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्ह्याचीही नोंद करण्यात येणार आहे.

TOP 50 | मास्क न लावणाऱ्यांकडून 30 कोटी वसून | बातम्यांचं अर्धशतक | 17 फेब्रुवारी 2021

हॉटेल,रेस्टॉरंटची वेळ यापुढं रात्री  10 वाजेपर्यंतच मर्यादित असणार आहे. शिवाय हॉटेल, रेस्टॉरंटसारख्या आस्थापनांवर ५० टक्क्यांहून अधिक व्यक्ती आढळल्यास २५ हजार दंड ठोठावण्यात येणार असून १०  दिवस हॉटेलला सील करण्यात येणार आहे.

लग्नसोहळ्यांवरही निर्बंध

कोरोना काळात सक्तीचा लॉकडाऊन लागू करण्यात आला, त्यावेळी अनेक समारंभ, विवाहसोहळ्यांचे बेत पुढे ढकल्यात आले, काही समारंभांच्या तारखा बदलल्या तर, काही रद्द झाले. पण, नियमांनमध्ये शिथिलता येताच पुन्हा एकदा या समारंभांना वेग मिळाला. यामध्ये अनेकदा मर्यादित आकडयापेक्षा जास्त उपस्थितांची संख्या कोरोना संसर्गाची भीती आणखी वाढवून गेली. सातत्यानं नियमांच्या अंमलबजावणीचे निर्देश देऊनही चित्र न बदलल्यामुळं आता अमरावतीमध्ये याबाबतही सक्तीचं पाऊल उचलण्यात आलं आहे. ज्याअंतर्गत लग्नासोहळ्यात निर्धारित आकड्यापेक्षा जास्त उपस्थिती आढळल्यास हॉलचालकाला ५० हजार दंड ठोठावण्यात येणार असून, १० दिवस हॉलला सील करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. शिवाय वधू- वर पक्षावरही फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळं किमान आतातरी कोरोना संसर्गाकडे सर्वांनी गांभीर्यानं पाहावं, असंच आवाहन सध्या सर्वच स्तरांतून करण्यात येत आहे.