अहमदनगर : जिल्ह्यातील भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांच्या थोरल्या मुलीचा साखरपुडा झाला असून राम शिंदे यांना जिल्हाधिकारी जावई मिळाला आहे. नुकत्याच झालेल्या व्हॅलेंटाइन डे म्हणजेच, 14 फेब्रुवारीला हा कार्यक्रम पार पडलाय. विशेष म्हणजे जावई जिल्हाधिकारी झाल्यानंतर त्याचा सत्कार करायला गेल्यानंतर या रेशीमगाठी जुळल्या आहेत.


अहमदनगर जिल्ह्यातल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव असलेल्या कर्जत तालुक्यातील चौंडी हे राम शिंदे यांचे गाव. याच चौंडी गावात पेशाने डॉक्टर असलेल्या अक्षता हिचा नुकताच जिल्हाधिकारी झालेल्या श्रीकांत सोबत साखरपुडा झाला. श्रीकांत खांडेकर असं जावयाचं नाव असून ते सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील राहिवासी आहेत. श्रीकांत बी. टेक करून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून आय. ए. एस. झाले. त्यानंतर नागरी सत्कारातच माजी मंत्री राम शिंदे आणि खांडेकर कुटुंबाची ओळख झाली. या कार्यक्रमातूनच सोयरीक जुळली आणि त्याचं नात्यात रूपांतर झालं. श्रीकांत हे सध्या म्हसुरी येथे प्रशिक्षण घेत आहेत.



राम शिंदे यांना 2 मुली आणि 1 मुलगा आहे. थोरल्या मुलीचे नाव अक्षता, दुसऱ्या मुलीचे नाव अन्वीता तर सर्वात लहान असलेल्या मुलाचे नाव अजिंक्य आहे. राम शिंदे राजकारणात सक्रीय होते. त्यामुळे मुलांच्या अभ्यासाकडे त्यांना फार लक्ष देता यायचे नाही. पत्नी आशाताई यांनीच मुलांच्या शिक्षणाकडे बारकाईने लक्ष दिले. राम शिंदेंच्या दोन्ही मुलींचे प्राथमिक शिक्षण हे चौंडी येथील जिल्हा परिषदेतील शाळेत झाले. त्यांनतर माध्यमिक शिक्षण जामखेड येथे आणि उच्च शिक्षण विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे जिल्ह्यात झाले. थोरली मुलगी अक्षता एम.बी.एस. झाली आहे.



श्रीकांत खांडेकर यांनी बी. टेकचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर गरिबीशी झगडत श्रीकांत खांडेकर यांनी बीटेकचे शिक्षण दापोली येथून पूर्ण केले. शासकीय सेवेत रुजू होण्याची जिद्द मनात असल्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या माध्यामातून ते आएएस झाले. त्यानंतर या घवघवीत यशाबद्दल सत्कार करण्यासाठी ग्रामस्थांनी तयारी सुरु केली. श्रीकांत याचा सत्कार माजी मत्री राम शिंदे यांच्या हस्ते करण्याचे ठरले. यावेळी राम शिंदे यांना आपली मुलगी डॉ. अक्षतासाठी योग्य वर म्हणून श्रीकांत खांडेकर मनात भरले. त्यानंतर हे नातं जुळून आले आहे.


शिंदे-खांडेकर व्याही झाले. डॉ. अक्षता आणि जिल्हाधिकारी श्रीकांत यांचा साखरपुडा झाला. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी हे नाते गुंफले गेले. श्रीकांत हे सध्या म्हसुरी येथे प्रशिक्षण घेत आहेत. तर तर मुलगी अक्षता ही सध्या पुणे येथे डॉक्टर आहे. माजी मंत्री राम शिंदे यांच्या कुटुंबातील हे पहिलेच कार्य असल्यामुळे या दिमाखदार सोहळ्याला अनेकांनी हजेरी लावली होती.