जळगाव : गेल्या काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनेकांनी कोरोनाच्या संदर्भात पाळाव्या लागणाऱ्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. गेल्या चार दिवसांत कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढल्याचं पाहयला मिळत आहे.


कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला त्यावेळेसपासून जळगाव हे कोरोनाच्या बाबतीत हॉटस्पॉट ठरल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर मात्र कोरोना रुग्णसंख्येत दिवसागणिक घट झाल्याने अनेक नागरिक हे निर्धास्तपणे बाहेर फिरताना आढळून आले होते. त्यात प्रशासनाकडून अनेक निर्बंध कमी करण्यात आल्याने किंबहुना उठविल्याने त्याचा परिणाम म्हणून गेल्या आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ दिसू लागली आहे. गेल्या साडेतीन महिन्यात नेहमीच शंभरच्या खाली असलेली रुग्णसंख्या या आठवड्यात मात्र शंभराचा आकडा ओलांडताना दिसून आल्याने प्रशासनही गंभीर झाले आहे.


कोरोनाच्या प्रतिबंधासाठी उपाय योजना करण्यात सुरुवात केली आहे. यासाठी कोणत्याही गर्दी होईल अशा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटाझरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा इशारा देखील प्रशासनाने आता दिला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक अडचणींचा सामना सर्वसामांन्य जनतेला करावा लागतोय तो टाळायचा असेल तर जनतेने कोरोनाच्या बाबतीतले नियम काटेकोरपणे पाळायला हवे, असं जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी म्हटलं आहे.


CoronaVirus | लॉकडाऊन पाहिजे की..., नियमांची पायमल्ली होत असल्यास कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश


कोरोनाची दुसरी लाट नाही..
कोरोनाची दुसरी लाट आली आहे, असं अजून म्हणता येणार नाही. मात्र, कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं दिसून आले आहे. ही वाढ जर झपाट्याने झाली तर रुग्ण सेवेसाठी आवश्यक साधन सामुग्रीसह प्रशासन सज्ज असल्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी म्हटलं आहे.