अमरावती : अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यामधील तीर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र झुंज येथे होडी उलटल्याने 11 जण बुडाल्याची घटना 14 सप्टेंबर, मंगळवारी घडली होती. त्यापैकी आणखी 5 जणांचे मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश मिळालं आहे. दरम्यान, नाव उलटून एकूण 11 जण नदीत बुडाले होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांचा शोध सुरु आहे. आतापर्यंत 8 जणांचे मृतदेह सापडले असून तीन जण अद्याप बेपत्ता आहेत. 


अमरावती जिल्हा प्रशासनाच्या बचाव पथकाकडून आठ जणांचा शोध घेतला जात होता. ही दुर्घटना परवा (मंगळवारी) घडली होती. त्यावेळी तीन मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश मिळालं होतं. परंतु, काल (बुधवारी) एकही मृतदेह सापडला नाही. अशातच आज सकाळी ज्या ठिकाणी बोट बुडाली तिथून साधारणतः 2 किलोमीटर अंतरावर पाच मृतदेह बचाव पथकाला सापडले. अशातच अद्याप तीन महिला बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे. 


अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यामधील तीर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र झुंज येथे अनेक भक्तगण दर्शनसाठी तर काहीजण दशक्रिया पार पाडण्यासाठी येत असतात. मंगळवारी सकाळी एकाच नात्यातील तीन कुटुंब दशक्रिया पार पाडण्यासाठी आले होते. या तीन कुटुंबातील अकरा सदस्य वर्धा नदीत बोट उलटल्यानं बुडाल्याची घटना घडली. यात आठ जणांचे मृतदेह सापडले आहेत. अजून तीनजण बेपत्ता असून त्यांचं शोधकार्य सुरु आहे. या शोध कार्यासाठी तालुका प्रशासनातील सर्व कर्मचारी, अधिकारी तसेच आमदार देवेंद्र भुयार घटनास्थळावर दाखल झाले होते. ग्रामस्थांच्या मदतीनं युद्धस्तरावर बचाव कार्य सुरु करण्यात आलं होतं. त्यानंतर अमरावती जिल्हा प्रशासनाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं. वरुड तालुक्यात या दुर्घटनेमुळे शोककळा पसरली आहे. 


एकाच कुटुंबातील अकरा सदस्य गाडेगावच्या मटरे कुटुंबात दशक्रिया विधीसाठी आलं होतं. दशक्रिया कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर ते मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास वरुडमध्ये फिरायला गेले. त्यावेळी लोक बोटीनं वर्धा नदी ओलांडून भगवान शंकराला नमन करण्यासाठी जात होते. अचानक बोट उलटली आणि सर्व अकरा जण बुडाले. यात बहीण, भाऊ, सून यांचा समावेश आहे. पाणबुडे आणि स्थानिक लोकांच्या मदतीने बेपत्ता लोकांचा शोध सुरु आहे. बेपत्ता झालेल्या लोकांच्या वाचण्याची शक्यता कमी असल्याचं सांगितलं जातं आहे.


बोटीत असलेल्या प्रवाशांची नावं : 



  • नारायण मटरे, वय 45 वर्षे, राहणार गाडेगाव

  • वंशिका प्रदीप सिवणकर, वय 2 वर्ष, रा. तिवसा घाट 

  • किरण विजय खंडाळे, वय 28 वर्ष, रा. लोणी (मृतदेह सापडला)

  • आश्विनी अरून खंडारे, वय 25 वर्ष, रा. सावंगा.

  • ऋषाली अरूणराव वाघमारे, वय 19 वर्ष रा. सावंगा.

  • अतुल गणेश वाघमारे, वय 25 वर्ष, रा. सावंगा.

  • निशा नारायन मटरे, वय 22 वर्ष रा. गोडगाव.

  • आदीत्यी सुखदेवराव खंडारे, वय 13 वर्ष, तारा सावंगा.

  • मोहणी सुखदेवराव खंडारे, वय 11 वर्ष, रा. तारासावंगा, 

  • पियुष तुळशीदास मटरे, वय 8 वर्ष, रा. गाडेगाव, 

  • पुनम प्रदीप सिवणकर, वय 26 वर्ष, रा. तिवसाघाट