नाशिक : सध्याचे युग हे धावपळीचे आहे. यामध्ये पोलिसांना तर खूपच धावपळीचा सामना करावा लागतो. पोलिसांना तर त्यांची ड्युटी कधी सुरू होते आणि कधी संपते हे देखील समजत नाही. बऱ्याच वेळा त्यांना जेवायला वेळ मिळत नाही. अनेकवेळा त्यांना बाहेरचे जेवण करावे लागते. त्यामुळे त्यांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन जानेवारी 2022 मध्ये आरोग्याच्या संदर्भात एक योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याद्वारे नाशिकमधील सर्व पोलिसांसह त्यांच्या कुटुंबियांची तपासणी केली जाईल, असे वक्तव्य नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी केले.
नाशिक शहरातील सर्व पोलीस हे जानेवारी 2023 पर्यंत निरोगी होतील. ते पूर्ण शक्तीने तुम्हाला सेवा देण्यास सक्षम असतील असेही पांडे यावेळी म्हणाले. नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्याशी 'एबीपी माझाने संवाद साधला, यावेळी त्यांनी ही माहिती दिली. पोलीस कर्मचारी जेव्हा नवीन असतात, तेव्हा त्यांना सेवा कशी द्यायची हे शिकायला मिळते. काही वर्षांनी ते सर्व शिकतात. मात्र, त्यांना आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. पोलिसांना कोणत्याही प्रकारची आरोग्यविषयक समस्या होऊ नये यासाठी ही योजना सुरू करण्यात येणार असल्याचे पांडे म्हणाले.
पोलीस कर्मचाऱ्यांना मधुमेह, रक्तदाब, संधिवात, बुद्धकोष्ठता, लठ्ठपणा, थायरॉईड, मानसिक ताण आणि मज्जासंस्थेशी संबंधित आजार होतात. अशा प्रकारचे आजार पोलिसांना होऊ नयेत म्हणून महाराष्ट्र सरकारतर्पफे आरोग्यविषयक योजनेचे अनावरण केले जाणार आहे. या योजनेद्वारे सर्व पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपचार केले जातील. तसेच त्यांच्या तपासण्या देखील करण्यात येतील. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की, एका वर्षात नाशिकमधील सर्व 3 हजार 400 पोलीस आजारमुक्त होतील असे पांडे यावेळी म्हणाले. याशिवाय हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर त्याचा अहवाल तयार करून वरिष्ठांना पाठवला जाईल. या प्रकल्पाच्या धर्तीवरच मुंबईसह अन्य जिल्ह्यांमध्येही देखील हा प्रकल्प राबविला जाणार असल्याचे पांडे यांनी सांगितले. जेणेकरून जास्तीत जास्त पोलिसांना त्याचा लाभ मिळावा आणि महाराष्ट्र पोलीस निरोगी व्हावेत असे पांडे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: