१. आजपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन, पेपरफुटी प्रकरण, एसटी संप, ओबीसी आरक्षण, वीज बिलाच्या मुद्यावरुन अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता, अधिवेशनाआधी महाविकास आघाडीची खलबतं
 
२. हिवाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्री उपस्थित राहणार का याकडे लक्ष, काल चहापानाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची दांडी, विरोधकांचा हल्लाबोल 


Maharashtra Winter Assembly Session : आजपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होतं आहे. यावेळचं अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजणार हे नक्की आहे. ओबीसी आरक्षण, पेपरफुटी, परीक्षेतला विलंब, मराठा आरक्षण, शेतकरी प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर या अधिवेशनात जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे. आघाडी सरकारच्या कारभारावरून आणि नेत्यांवरच्या आरोपांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची चिन्हं आहेत. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकही या अधिवेशनात होण्याची शक्यता आहे. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज भाजप नेत्यांची दुपारी बैठक आहे. यात अधिवेशनातल्या रणनीतीवर खलबतं होणार असल्याची माहिती मिळत आहे. राज्याचं हिवाळी अधिवेशन आजपासून (बुधवार) सुरु होत असून, हे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. आधीच नागपूरमध्ये न होणारे हिवाळी अधिवेशन आणि अधिवेशनाचा कमी कालावधी यामुळे विरोधक आक्रमक आहेत. त्यातच ओबीसीच्या राजकीय आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालामुळे ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढवण्याची शक्यता आहे. याचसोबत टीईटी परीक्षा घोटाळा, म्हाडा पेपर फुटी प्रकरण यासारख्या मुद्यावरून भाजप अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसांपासून सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे. भाजपने आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलावली असून, अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा मास्टर प्लॅन भाजप आखत आहे. कमी कालावधीचे अधिवेशन असले तरी या अधिवेशनात सरकारची कोंडी करण्यासाठी भाजप रणनीती आखत आहे. 


३. विरोधकांना उत्तरे देण्याची सरकारची तयारी; शक्ती विधेयक मांडणार, अध्यक्षांची निवड होणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती


४. नागपूर विधानपरिषदेतील उमेदवार घोळाची काँग्रेस हायकमांडकडून दखल, नाना पटोले, नितीन राऊत आणि सुनील केदारांची वरिष्ठांकडून कानउघडणी


५. शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकरांची ईडीकडून आठ तास चौकशी, नेमकी कोणत्या प्रकरणात चौकशी झाली हे अद्याप अस्पष्ट


६. ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाईट कर्फ्यूसह वेगवेगळ्या निर्बंधांचा विचार करा, केंद्र सरकारचं सर्व राज्यांना पत्र, जिल्हा स्तरावर खबरदारी घेण्याच्या सूचना


७. ओमायक्रॉनचा संसर्ग वाढतोय; देशातील एकूण रुग्णसंख्या 216, महाराष्ट्र-दिल्लीत सर्वाधिक रुग्ण


८. टोल टॅक्समधून 40 हजार कोटी कमावतं केंद्र सरकार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती 


९. परस्पर सहमतीनं शरीरसंबंध ठेवल्यास ती फसवणूक नाही, पालघरप्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल, तीन वर्षांच्या संबंधांनंतर बलात्काराचा आरोप करण्यावरुनही खडसावलं


१०. आयआयटी मुंबईची  रेकॉर्डब्रेक प्लेसमेंट, पहिल्याच टप्प्यात तब्बल 1172 नोकऱ्या, मागील वर्षांत खाली गेलेला आलेख यंदा उंचावला