Shambhuraje Desai PC : सध्या राज्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा (Maharashtra Karnataka Border Dispute) प्रश्न पेटला आहे. असं असताना राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. शिंदे गटाचे (Shinde Group) नेते शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊतांनी तोंड आवरावं, असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. संजय राऊतांना सीमावादावर बोलण्याचा अधिकार नाही. राऊतांनी वादग्रस्त वक्तव्य थांबवावीत, अन्यथा त्यांना चोख उत्तर दिलं जाईल, असं म्हणत देसाई यांनी राऊतांना इशारा दिला आहे. 


'राऊतांना तुरुंगाबाहेरच वातावरण मानवत नाही'


संज राऊतांवर टीका करताना शंभूराज देसाई म्हणाले की, 'आताच तुम्ही साडेतीन महिन्यांचा आराम करुन तुरुगांबाहेर आला आहात. तुरुंगाबाहेरच वातावरण तुम्हाला मानवत नाही असं वाटतंय, म्हणून तुम्ही अशी वक्तव्य करताय. तुम्हाला पुन्हा आराम करण्याची वेळ येऊ नये. त्यामुळे तुम्ही अशी वक्तव्य करणं टाळावं.'


'...आम्ही दोन हात करायला तयार'


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात वक्तव्य केल्यास आम्ही दोन हात करायला तयार आहोत, असं देसाई यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र-कर्नाटक वादावर आम्ही चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय. केंद्रानं या प्रकरणात लक्ष घालावं.  संजय राऊत यांची बोलण्याची पद्धत महाराष्ट्र सहन करणार नाही. संजय राऊतांना षंड बोलण्याचा अधिकार नाही. संजय राऊतांनी आपलं तोंड आवरावं, असा इशारा देसाई यांनी राऊतांना दिला आहे. 


शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत जे वक्तव्य केले त्याचा मी धिक्कार करतो. केंद्राने या विषयात लक्ष द्यावं, समन्वय साधावा यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. असं असताना राऊतांनी 'षंड' शब्द वापरला. संजय राऊत यांनी स्वतःलढ्यात उतरा आणि मग मुख्यमंत्र्यांबाबत बोला, असं देसाई यांनी म्हटलं आहे. 


कर्नाटक न्याय व्यवस्थेकडे राऊतांना आमंत्रण आलं होतं. त्यावेळी ते गेले नाहीत. न्यायालयाचे कवच कुंडल असताना तुम्ही जाऊ शकला नाहीत मग संजय राऊतांना काय म्हणावं? असा सवाल देसाई यांनी उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वापेक्षा राऊतांना शरद पवार यांचं नेतृत्व महत्त्वाचं वाटत आहे. उद्धव ठाकरे यांनी मागील अडीच वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला पक्ष बांधला आहे, आता हेच समोरं येत आहे, असं म्हणत देसाई यांनी उद्धव ठाकरेंवरही हल्ला चढवला आहे.