Maharashtra Karnataka Border : कर्नाटकातील सौंदत्ती (Savadatti) इथल्या रेणुका देवीच्या यात्रेसाठी (Renuka Devi Yatra) गेलेल्या महाराष्ट्रातील भाविकांना कर्नाटक पोलिसांनी (Karnataka Police) सुरक्षा पुरवली आहे. रेणुका देवीच्या यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी सौंदत्ती डोंगरावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. देवीच्या दर्शनासाठी डोंगरावर जाणाऱ्या मार्गावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


रेणुका देवीच्या यात्रेचा आज मुख्य दिवस
महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशमधील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या यात्रेला 5 डिसेंबरपासून सुरुवात झाली. 9 डिसेंबरपर्यंत भरणाऱ्या यात्रेसाठी जवळपास आठ लाखांहून अधिक भाविक येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 7 डिसेंबर म्हणजेच आज यात्रेचा मुख्य दिवस आहे. रेणुकादेवी यात्रेनिमित्त कोल्हापूरसह महाराष्ट्रातील अनेक भागातील लाखो भाविक सौंदत्ती इथे दर्शनासाठी गेले आहेत. त्यामुळे यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महाराष्ट्रातील भाविकांना कर्नाटक पोलिसांचं सुरक्षा कवच आहे.


अन्यथा मला कर्नाटकात यावं लागेल : संभाजीराजे छत्रपती
दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी देखील रेणुका देवीच्या यात्रेसाठी कोल्हापुरातून सौंदत्ती इथे जाणाऱ्या भाविकांना कर्नाटक सरकारने सुरक्षा देण्याचं आवाहन ट्वीटद्वारे केलं आहे. ट्वीटमध्ये संभाजीराजे म्हणतात की, "छत्रपती शिवरायांचे चित्र असलेल्या वाहनांची कन्नडीगांनी केलेली तोडफोड निषेधार्ह असून महाराष्ट्रात त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. रेणुकादेवी यात्रेनिमित्त कोल्हापूरातील लाखो भाविक सौंदत्ती येथे आहेत,त्यांची सुरक्षा कर्नाटक सरकारने करावी अन्यथा वेळप्रसंगी मला कर्नाटकात यावे लागेल."






कर्नाटकात महाराष्ट्राच्या ट्रकची तोडफोड, राज्यभरात संतापाची लाट 
बेळगाव सीमाभागातील हिरेबागवाडी टोलनाक्यावर काल (6 डिसेंबर) महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या सहा ट्रकची तोडफोड कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी केल्यानंतर राज्यात संतापाची लाट आहे. या प्रकारानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना फोन करुन निषेध व्यक्त केला. यावर बसवराज बोम्माई यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचं तसंच महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना संरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं.