Devendra Fadnavis : शेतकरी प्रश्नासंदर्भात सरकारला जाग येण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी 'जागर शेतकऱ्याचा, आक्रोश महाराष्ट्राचा' हे राज्यव्यापी अभियान सुरु केलं.  या अभियानाचा आज समारोप होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टेंभुर्णी या ठिकाणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत या राज्यवापी अभियानाचा समारोप होणार आहे. यावेळी सायंकाळी सहा वाजता देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा देखील होणार आहे. त्यामुळे शेतकरी प्रश्नावर आज फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


दरम्यान,  जागर शेतकऱ्याचा, आक्रोश महाराष्ट्राचा या अभियानाच्या समारोपाला शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावाली असे आवाहन सदाभाऊ खोत यांनी केलं आहे. आपल्या हक्काच्या लढाईसाठी एकत्र यावं. या अभियानाचा समारोप म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेला कायदा आणि प्रशासनाला धडा शिकवण्यासाठी हा शेतकरी हक्काचा लोकजागर असल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.


दरम्यान, सध्या राज्यातील शेतकऱ्यांसमोर, युवकांसमोर, शेतमजुरांसमोर अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली 'जागर शेतकऱ्यांचा, आक्रोश महाराष्ट्राचा' हे राज्यव्यापी अभियान राबवण्यात आलं. या अभियानाच्या माध्यमातून सदाभाऊ खोत यांनी राज्यभर दौरा केला. या अभियानाची सुरुवात 29 एप्रिलपासून झाली होती. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुरुवात झाली होती. या अभियानामध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे देखील सामील झाले होते.
 
गेल्या अडीच वर्षापासून महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, बेरोजगार तरुण यांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. परंतू राज्य सरकार कोणत्याही प्रश्नाकडे लक्ष न देता केवळ आरोप-प्रत्यारोप करत आहे. आज महाराष्ट्रात अनेक प्रश्न गंभीर बनले आहेत. लोडशेडींग, अतिरिक्त ऊस, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, विज बिलमाफी, शैक्षणिक समस्या, रखडलेल्या भरती, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, पेट्रोल डिझेल, दरवाढ,  अतिवृष्टी, वादळ, महापुर, दुष्काळ, रासायनिक खत टंचाई, बोगस बियाणे, शेतमाल हमीभाव या समस्या आहेत. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे अभियान राबवण्यात आल्याचे खोत यांनी सांगितले.