Rahul Gandhi on Modi Govt : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नोटाबंदी, जीएसटी आणि प्रकल्पांचे स्थलांतरण या मुद्यावरुन केंद्रातील भाजप सरकारवर (BJP Govt) जोरदार निशाणा लगावला. तुमचे प्रकल्प गुजरातला जात आहेत. कारण, गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत, त्यामुळं महाराष्ट्रातील प्रकल्प तिथे नेले जात असल्याचे राहुल गांधी म्हणाले. एअरबस आणि फॉक्सकॉन हे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेले आहेत. याच मुद्यावरुन राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली. ते नांदेड जिल्ह्यातील नायगाव इथे बोलत होते.


काळा पैसा संपला का? राहुल गांधींचा सवाल


ज्या दिवशी नोटबंदी झाली, ज्या दिवशी चुकीचा जीएसटी लागू झाला त्या दिवशी भारतावर आर्थिक सुनामी आल्याचे गांधी म्हणाले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, मी काळ्या पैशाविरुद्ध लढाई लढत आहे. आता पाच सहा वर्षे झाली. या वर्षांमध्ये काय झालं ते तुमच्यासमोर असल्याचे गांधी म्हणाले. काळा पैसा संपला का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातून एअरबसचा प्रकल्प गेला आहे. तो कुठे गेला? का गेला? हेच कळत नसल्याचे गांधी म्हणाले. गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळं तिथे प्रकल्प जात असल्याचे राहुल गांधी म्हणाले.


भारत समजून घ्यायचा असेल तर ....


केंद्र सरकारने महाराष्ट्रातून मोबाईल फोनचा प्रकल्प काढून घेतल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. मोबाईल फोन प्रोजेक्ट, फॉक्सकॉनचा प्रोजेक्ट, कुठे गेला? असे गांधी म्हणाले. तरुणांचे भविष्य, त्यांचा रोजगार तुमच्या राज्यातून हिसकावला जात असल्याचे राहुल गांधी म्हणाले. शेतकरी आणि मजुरांचा भारत समजून घ्यायचा असेल तर वाहनाने प्रवास करुन समजणार नाही. भारत समजून घ्यायचा असेल तर तो रसत्यावरुन चालून समजेल, विमान, हेलिकॉप्टर किंवा वाहनांनी फिरुन समजणार नाही. असेही राहुल गांधी म्हणाले. 


भारत जोडो यात्रेचा आज महाराष्ट्रातील चौथा दिवस


काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातून मार्गक्रमण करत आहे. आज या यात्रेचा आज 64 वा दिवस आहे. तर महाराष्ट्रातील या यात्रेचा चौथा दिवस आहे. दरम्यान, आज सकाळी सहा वाजता नायगाव तालुक्यातील कापशी गुंफा या ठिकाणाहून भारत जोडो यात्रेची उत्साहात सुरुवात झाली. या यात्रेदरम्यान राहुल गांधी विविध घटकातील लोकांना भेटून संवाद साधत आहेत. यात्रा आज नांदेड शहरात 10 वाजण्याच्या सुमारास पोहोचेल. त्यानंतर देगलूर नाका, बाफना टी पॉईंट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महात्मा फुले पुतळा या  प्रमुख रस्त्यावरून व चौकातुन मार्गक्रमण करत संध्याकाळी पाच वाजता जाहीर सभा घेत आजचा या यात्रेचा टप्पा संपेल.


भारत जोडो यात्रेचा आणखी किती प्रवास बाकी?


काँग्रेसची भारत जोडी यात्रा सुरू होऊन 64  दिवस झाले आहेत. यादरम्यान यात्रेचा प्रवास हा सहा राज्यांतील 27 जिल्ह्यातून गेला आहे. सध्या ही यात्रा महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातून जात आहे. आणखी 1 हजार 856 किमीचे अंतर पार करायचे आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Bharat Jodo Yatra: युवकांचे भविष्य, रोजगार हिसकावून घेतला जातोय, राहुल गांधींची खंत