मुंबई :  एबीपी माझाच्या बातमीची दखल आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी घेतली आहे. एसटी संपामुळे जिथे शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांना अडचण होत आहे. तिथे पर्यायी व्यवस्था देणार असल्याचं अनिल परब म्हणालेत. काल एबीपी माझाने आदिवासी पाड्यावरील विद्यार्थ्यांचा संघर्ष दाखवला होता. ग्रामीण भागात एसटी संपामुळे विद्यार्थ्यांना 10 किलोमीटर पायपीट करावी लागते आहे.  माझाच्या या बातमीची दखल परिवहन मंत्र्यांनी घेतली आहे.


एसटी सेवा बंद असल्याने दहावी बारवी बोर्ड परीक्षा सुरू असताना दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आठ ते दहा किलोमीटरची पायपीट करावी लागते. यासंदर्भात एबीपी माझाने बातमी दाखवल्यानंतर या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची पायपीट थांबावी यासाठी  अनेकांच्या मदतीचे हात या विद्यार्थ्यांसाठी पुढे आले आहेत. पालघर तालुक्यातील पाड्यावर राहणाऱ्या मुलांसाठी उद्याच्या बोर्डाच्या पेपरपासून बोर्डाच्या परीक्षा पूर्ण होईपर्यंत काही दानशूर व्यक्तींनी या विद्यार्थ्यांना घर ते परीक्षा केंद्र मोफत गाड्यांची व्यवस्था करून दिली आहे.


उद्यापासून या भागातील रोजची पायपीट थांबणार आहे कारण अगदी घरापासून केंद्रापर्यंत आणि परीक्षा झाल्यानंतर केंद्रापासून घरापर्यंत ही गाडीची सेवा दिली  जाणार आहे. पालघर मधील सामाजिक कार्यकर्ते आणि मनसैनिक तुळशी जोशी, पुण्याच्या कॅफे दुर्गा ब्रॅंडचे मालक व्यवसायिक कपिल कुलकर्णी, रत्नागिरीच्या अॅडव्होकेट जया सामंत हे या रोज पायपीट करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी धावून आले आहेत.


स्कुल चले हम' म्हणत हसत, खेळेत शाळेला जाणारे विद्यार्थी आपण जाहिरातीत पाहिलेत. मात्र, या मुंबईपासून सव्वाशे किमी असलेल्या डहाणू तालुक्यातील या पाड्यातील विद्यार्थ्यांमध्ये शाळेत जाऊन परीक्षा देण्याचा उत्साह जरी मनातून असला तरी त्यांना बोर्डाच्या परीक्षेआधी आणि नंतर रोजच एका मोठ्या पायपीटीच्या परीक्षेला सामोरे जावं लागत आहे. पाड्यातून परीक्षा केंद्रावर  जाण्यासाठी या मुलांना पेपरच्या दोन तास अगोदर सकाळी 8 वाजता निघावे लागते. शाळेत पायपीट करत जायचं परत पायपीट करत घरी जातात.  यामध्ये मुले थकून  जातात.