Monkeypox Virus : जगभरात कोरोना प्रादुर्भावापाठोपाठ आता मंकीपॉक्सनं धाकधूक वाढवली आहे. मंकीपॉक्सच्या रुग्णसंख्येत हळूहळू वाढ होत आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. WHOच्या मते, मंकीपॉक्स हा विषाणूजन्य जुनोटिक रोग आहे. याचे विषाणू प्राण्यांपासून माणसात पसरतात. सध्या भारतात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, मात्र इतर देशांतील प्रकरणे पाहता केंद्रीय आरोग्य विभागाने सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. या सूचनेनंतर महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने मंकीपॉक्सबाबत मार्गदर्शक तत्वे (Advisory) जारी केली आहे. या सूचनेनंतर राज्याच्या आरोग्य विभाग मंकीपॉक्सबाबत सतर्क होताना दिसत आहे.


राज्य सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जारी
जगभरात मंकीपॉक्सच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झालं आहे. केंद्र सरकारनं हे प्रकरण गांभीर्यानं घेत आंतरराष्ट्रीय विमानतळं, बंदर आणि देशाच्या सीमाभागांत लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान महाराष्ट्रात राज्य सरकारने देखील अॅडव्हायझरी जारी केली आहे.


महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाची मंकीपॉक्स संदर्भात मार्गदर्शक तत्वे


-गेल्या 21 दिवसांत प्रभावित देशांमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व संशयित रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.


-या संशयित रुग्णांची माहिती स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने आरोग्य विभागाला देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


-अशा रूग्णांवर उपचार करताना सर्व संसर्ग नियंत्रण पद्धती पाळल्या पाहिजेत.


-रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू केले जाईल.


-रक्ताची थुंकी आणि संशयित रुग्णांचे नमुने एनआयव्ही पुणे येथे तपासणीसाठी पाठवले जातील.


-गेल्या 21 दिवसात रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांना ताबडतोब ओळखावे लागेल आणि त्यांना क्वारंटाईन करावे लागेल.


-जोपर्यंत संशयित रुग्णांच्या सर्व जखमा बऱ्या होत नाहीत आणि त्वचेचा एक नवीन थर तयार होत नाही, तोपर्यंत क्वारंटाईन संपवता येणार नाही, असे यात सांगण्यात आले आहे. 


मंकीपॉक्सची लक्षणं काय? 


तज्ज्ञांच्या मते 'मंकीपॉक्स' हा एक दुर्मिळ विषाणू आहे. ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जे सामान्य लक्षणे दिसतात, तीच लक्षणे यात दिसून आली आहेत. यामध्ये संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ दिसू लागते. याशिवाय ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात.


कसा वाढतो संसर्गाचा धोका?


संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू त्वचा, श्वसनमार्गातून किंवा डोळे, नाक आणि तोंडातून आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. तसेच, संक्रमित प्राणी देखील या विषाणूचे सक्रिय वाहक असू शकतात. अशा प्राण्याच्या संपर्कात आल्याने, किंवा विषाणू-दूषित वस्तूंद्वारे देखील ‘मंकीपॉक्स’ पसरू शकतो. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये ‘मंकीपॉक्स’ची सर्वाधिक प्रकरणे आढळतात. मुख्यतः आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे किंवा आयात केलेल्या प्राण्यांमुळे हा विषाणू पसरतो.


महत्त्वाच्या इतर बातम्या :