Bhagat Singh Koshyari : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला आहे. राज्यातील सत्तासंघर्ष निर्णायक टप्प्यावर आलेला असताना, कोश्यारींना मोठा विरोध झाला होता. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्यासाठी पंतप्रधानांकडे इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळं अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पदमुक्त करण्यात आले आणि त्यांचा 3 वर्ष, 5 महिने आणि 12 दिवसांचा प्रवास थांबला आहे. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांच्या नावाची घोषणा राष्ट्रपती कार्यालयाकडून करण्यात आली.


भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबत विरोधक आणि सर्वसामान्य लोकांमध्ये संताप 


महाराष्ट्राचे राज्यपाल झाल्यापासून भगतसिंह कोश्यारी पहिल्या दिवसांपासून चर्चेत होते. त्यांनी मराठीतून शपथ घेतली होती. त्यानंतर राज्यातील राजकारण तापण्यापर्यंत त्यांनी वेळोवेळी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली होती. राज्यात त्यांच्याबद्दल विरोधक आणि सर्वसामान्य लोकांमध्ये संताप होता. त्यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी होत होती. अनेक ठिकाणी विरोधकांनी आंदोलन आणि मोर्चे देखील काढले होते. त्यानंतर  भाजपची गोची होत असल्यानं राज्यपालांवर कारवाई होईल अशी चर्चाही गेल्या अनेक महिन्यांपासून होती. त्यात अखेर साडेतीन वर्षांनी कोश्यारींना राज्याच्या राज्यपाल पदावरून पदमुक्त केले गेले आहे. त्यामुळं विरोधकांकडून निर्णयाचे स्वागत केले जात आहे.


राज्यपालांना वाढता विरोध पाहाता कारवाई होण्यापूर्वीच, काही दिवसापूर्वी कोशयारीनी स्वतः राजकीय जबाबदारीतून मुक्त करा अशी इच्छा पंतप्रधानांना कळवल्याचं राज्यपाल कार्यालयाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, यानंतर आता काय होणार याकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होतं. राज्यपाल बदलणार हे नक्की होतं, कारण  कोश्यारींच्या वक्तव्यांनी भाजपला  गेल्या काही महिन्यात राज्यांत फटका बसत होता. त्यामुळं  कोश्यारींना हटवल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी सौम्य प्रतिक्रिया दिल्या आहेत.


भगतसिंह कोश्यारी आतपर्यंत कशामुळं चर्चेत आणि वादात होते?



  • मराठीतून शपथ घेणारे राज्यपाल म्हणून वेगळेपण दाखवले.  त्यांनी मराठीतून अभिभाषण केले होते.  राज्यपालपदाची सूत्रं हातात घेतल्यानंतर थोड्याच दिवसात राज्यात निवडणुका झाल्या. त्यानंतर सत्तास्थापनेचं मोठं नाट्यही घडलं. कोश्यारींनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना अचानक शपथ दिल्यानंतर त्यांच्यावर भाजपची बाजू घेत असल्याचा आरोप झाला. त्यानंतर कोरोनाची साथ आल्यानंतरही भाजपचे नेते वारंवार राज्यपालांकडे जाऊन भेटी घेत होते. त्यामुळं सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

  • उद्धव ठाकरेंची आमदार म्हणून नेमणूक करायला कोश्यारींनी विरोध केल्यानंतर शिवसेनेने त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. अखेर पंतप्रधान मोदींनी सांगितल्यानंतर राज्यपाल कोश्यारींनी उद्धव ठाकरेंचा आमदार व्हायचा मार्ग मोकळा केला.

  • विद्यापीठाच्या परीक्षांच्या मुद्द्यावरुनही राज्य सरकारच्या विरोधात कोश्यारींनी भूमिका घेतली. त्यावेळी संघर्ष टाळून राज्य सरकारने कुलपती असलेल्या राज्यपालांचं म्हणणं मान्य केलं. त्यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी कोश्यारींना केलेल्या नमस्काराचा फोटो राजभवनने जारी केला आणि त्यावर सोशल मीडियात एकच चर्चा सुरू झाली.

  • गुजराती-राजस्थानी माणसाला मुंबईतून बाहेर काढलं तर मुंबईत पैसा उरणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य कोश्यारींनी केले होते.

  • समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल?असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं होतं. 

  • महात्मा फुले आणि सावित्रीबाईंबद्दल वादग्रस्त वक्तव्य

  • नेहरूंच्या 'शांतीदूत' प्रतिमेमुळे भारत कमकुवत असे वक्तव्य त्यांनी केलं होतं.

  • छत्रपती शिवाजी महाराज तर जुन्या काळातले आदर्श आहेत असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते

  • आघाडी काळातील राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी मंजुर न केल्याने राज्यापालांविषयी संताप

  • राज्यपालासारख्या घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने पक्षीय राजकारण करणं अपेक्षित नसतं. पण ते भाजपला झुकतं माप देत असल्याचा आरोप त्यांच्यावर वारंवार झाला.


कोश्यारी गेल्या तीन वर्षंपासून वादग्रस्त ठरलेच मात्र पुढे देखील थोडा काळ ते आणखी राहिल्याने याचा फटका राज्यातील या सरकारला आणि भाजपला झाला असता. त्यामुळं हा निर्णय होणं अपेक्षित आहे. मात्र, त्याला दुसरी देखील कारणे असल्याचे मत राजकिय विश्लेषकांनी व्यक्त केलंय. इतक्या वादांनंतर भगतसिंह कोश्यारी हे चर्चेत असणारे राज्यपाल 3 वर्ष, 5 महीने आणि 12 दिवसानंतर महाराष्ट्रातून अखेर त्यांच्या मायभूमीत परतत आहे. मात्र, त्यांनी केलेली वक्तव्य आणि वाद यामुळं ते कायम लक्षात राहतील. 


महत्त्वाच्या बातम्या:


Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर, रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल