Sharad Pawar In Pune : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाव न घेत चिमटा काढला आहे. पुण्यातील (Pune) एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मोदींनी केलेल्या एका वक्तव्याचा आधार घेत संसदेत जायला का घाबरतो? याचं कारण सांगितलं आहे. नुकतंच पार पडलेल्या जागतिक मराठी संमेलनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी हजेरी लावली होती. त्यांच्याबरोबर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेही उपस्थित होते. 


शरद पवार म्हणाले, आता मी सुशीलकुमार शिंदे यांचा उल्लेख आवर्जून करु इच्छितो, कारण ते म्हणाले मी शरद पवारांच्या तालमीत तयार झालो. हल्ली मला असं कोणी म्हटलं की भीती वाटते. त्याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी कोणीतरी म्हटलं की शरद पवारांचे बोट धरुन राजकारणात आलो. तेव्हापासून तर मी दिल्लीच्या संसदेत जायलाही घाबरतो, असं म्हणत त्यांनी नाव न घेता मोदींना टोला लगावला आहे.


नाव न घेता टोला लगावला अन् सभागृहात हशा पिकला


सुशीलकुमार शिंदे यांनी भाषणात त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील शरद पवारांचं योगदान असल्याचं सांगितलं. मी शरद पवार यांच्या तालमीत तयार झालो, असं वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केलं. त्यानंतर काही वेळात शरद पवार भाषणासाठी स्टेजवर गेले आणि त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या भाषणाचा आशय घेत मोदींना नाव न घेता टोला लगावला. त्यावेळी सगळ्या सभागृहात हशा पिकला होता. 


घाशीराम कोतवाल जर्मनीत कसे पोहचले?


घाशीराम कोतवालचे कलाकार जर्मनीला कसे पोहोचले? हा प्रसंग शरद पवारांनी सांगितला. बाळासाहेब ठाकरे यांचा या नाटकाला विरोध होता, त्यामुळे पुण्यावरुन मुंबईला येणाऱ्या या नाटकातील कलाकारांना पोहोचू द्यायचं नाही, असा निश्चय केला आणि पुणे मुंबई मार्गावर खोपोली भागात त्यांना अडवायचे नियोजन आखण्यात आले होते. तेव्हा मी किर्लोस्कर यांचे दोन-तीन विमानं मागवली आणि त्यांना पुण्यातून थेट मुंबई विमानतळावर पोहोचवले. त्यानंतर ते विनाअडथळा जर्मनीला पोहोचले होते, असाही किस्सा यांनी सांगितला. 


मराठीची टिंगल टवाळी रोखली पाहिजे


मराठी भाषेचा अधिकाधिक वापर व्हावा. मराठी भाषेचा प्रसार व्हावा, यासाठी ती अंगवळणी व्हायला हवी. काही ठिकाणी टिंगल टवाळी केली जाते. ती रोखायला हवी, असंही शरद पवार म्हणाले. त्यावेळी त्यांनी एका रशियन महिलेचं उदाहरण दिलं. ते म्हणाले, परदेशातील एका कार्यक्रमात रशियाची इरिना भेटली होती. ती शुद्ध मराठीत बोलत होती शिवाय वारीही करते. त्यावेळी वारीत कसे जातात विचारलं असता. त्या म्हणाल्या पायी जाते. आळंदी ते पंढरपूर पायी जातात त्याला वारी म्हणतात आणि सासवड, बारामती अशा ठिकाणी येऊन वारीसोबत जोडतात ते हौशी वारकरी असतात. वारीबद्दल या महिलेला माहिती होती कारण त्या महिलेस मराठीबद्दल आस्था होती, असंही ते म्हणाले.