Agricluture News : राज्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) हजेरी पाहायला मिळत आहे. आजही अनेक भागात पावसाची शक्यता (Maharashtra Rain) हवामान विभागाने वर्तवली होती, त्याप्रमाणे अनेक भागात पाऊस सुरु आहे. गुढीपाडव्याच्या दिवशीही महाराष्ट्राच्या अनेक भागात पाऊस पडला. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पाहायला मिळत आहे. तर काही भागात गारपीटही सुरु आहे. भारतीय हवामान विभागाने, आज राज्यात काही ठिकाणी पावसाचा ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे.


विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी


हवामान विभागानं वर्तविलेल्या अंदाजानुसार, भंडाऱ्यात बुधवारी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. मागील काही दिवसांपासून प्रचंड उकाडा वाढल्याने नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, मंगळवारी रात्रीच्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसामुळं वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांची उकाळ्यापासून सुटका झाली आहे. अवकाळी पाऊस उन्हाळी भात पिकाला नवसंजीवनी ठरला आहे.


आंबा, निंबू, टरबूज आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान


अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट, बाळापुर आणि अकोला तालूक्यात वादळी वाऱ्याचा जोरदार पाऊस झाला आहे. तर पातुर तालुक्यातल्या मळसुर भागात गारपीटीसह जोरदार अवकाळी पाऊस पडला आहे. या गारपीट आणि अवकाळीमुळे आंबा, निंबू, टरबूज आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. रात्रीही वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पाऊस सुरू होता. पावसामुळे शेत-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अकोला जिल्ह्यातल्या चार तालुक्यातल्या अवकाळी पावसाने चांगलंचं झोडपून काढलं आहे. 


विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची हजेरी


यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडाटात जोरदार पावसाने हजेरी लावली. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण होते. आज अचानक सायंकाच्या सुमारास वादळी वारा सुरू होऊन रात्री साडे सात वाजताच्या सुमारास सुटला होता. तर त्यानंतर विजेच्या कडकडाटासह परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला. यवतमाळ, राळेगाव, बाभूळगाव, कळंब, आर्णी यासह इतर भागात या अवकाळी पाऊस पडला. पावसामुळे आंबा, उन्हाळी भुईमूग, पालेभाज्या या पिकांचे नुकसान झाले असल्याची झाल्याची माहिती समोर येत आहे. 


परभणी शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत पाऊस  


परभणी शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली होती. आज सकाळपासूनच सर्वत्र उकाडा प्रचंड वाढला होता त्यातच सायंकाळच्या सुमारास परभणी, पूर्णा, गंगाखेड, पालम या चार तालुक्यांसह इतर ठिकाणीही जवळपास अर्धा ते पाऊण तास जोरदार पाऊस बरसलाय, ज्यामुळे परभणी करांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.


ढगाळ वातावरणासह जोरदार अवकाळी पाऊस


वर्ध्याच्या कारंजा भागात पहाटे वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. कारंजा तालुक्यातील काही गावांमध्ये वीजपुरवठा देखील खंडित झाला होता. वर्ध्यात मध्यरात्रीपासून आकाशात ढगांचा आवाज करत विजेच्या कडकडाटसह जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली. पहाटेच्या सुमारास ढगाळ वातावरण  असताना पुन्हा अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. काही भागात जोरदार पाऊस पडत आहेत, तर कुठे पावसाटी रिपरिप सुरु झाली आहे. पावसामुळे उकड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी आकाशात  विजेचा कडकडाट आणि ढगांचा आवाज मोठ्या प्रमाणात होत आहे. अवकाळी पावसामुळे शेतातील बागायती पिकांना आणि उन्हाळी पिकांना काही प्रमाणात फटका बसला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Rain News : अवकाळी पावसानं झोडपलं! मराठवाड्यात यलो, तर विदर्भात ऑरेंज अलर्ट