Vidarbha Weather Update : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) पहिल्या टप्प्याला पूर्व विदर्भापासून सुरुवात होते आहे. त्या पार्श्वभूमीवर जवळ जवळ सर्वच राजकीय पक्षानी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली असून रोज अनेक सभा, बैठका आणि प्रचार-प्रचारांचा धुरळा सध्या विदर्भात अनुभवायला मिळतोय. अशात आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे एकाच आढवाड्यात सलग दुसऱ्यांदा विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. चंद्रपूर पाठोपाठ आज मोदींची नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील कन्हान येथे सभा पार पडणार आहे. असे असले तरी विदर्भात एकीकडे निवडणुकांच्या प्रचारसभांच्या तोफ धडाडत असताना, मध्येच अवकाळी ढगाचाही गडगडाट होतानाचे चित्र आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाकडून(IMD) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. परिणामी, मोदींच्या या सभेवर पावसाचे सावट असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे. 


विदर्भात 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट 


नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने आज नागपूरसह विदर्भातील वर्धा, अमरावती, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवरही पावसाचे सावट असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मंगळवारी, 9 एप्रिलला रात्रीच्या सुमारासही नागपूर शहरासह लगतच्या परिसरात जोरदार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि विजांचा गडगडाट बघायला मिळाला.  हवामान विभागाने वर्तविल्या अंदाजानुसार, मंगळवारी दमदार पावसाने एंट्री केल्याने त्याचे काही परिणाम मोदींच्या सभास्थानी देखील दिसून आला आहे.


सभास्थळी साचले पावसाचे पाणी 


नागपुरातील कन्हान येथील मोदींच्या सभास्थानी गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे. या परिसरात तीन डोम  उभारण्यात आले असून प्रत्येक डोममध्ये अनेक सेक्शनमध्ये खुर्च्या लावण्यात आले आहेत. मात्र दमदार पावसामुळे सखल भागातील काही सेक्शनमध्ये पावसाचे पाणी साचलेले आहे. तर खुर्च्यांवरही पावसाचं पाणी साचलेलं आहे. त्यामुळे सखल भागातील पाणी संध्याकाळच्या सभेपूर्वी सुकवणे किंवा बाजूला करणे हे मोठे आव्हान आता असणार आहे. दरम्यान, पोलिसांनी सभास्थान आणि अवतीभवतीच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त लावला असून काही कठोर नियमही आखून दिले आहेत.


पोलिसांकडून सभेसंदर्भात अनेक निर्बंध


रामटेक लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची आज कन्हान येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या अनुषंगाने परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अनेक निर्बंध ही पोलिसांकडून लावण्यात आले आहे. कन्हान परिसरातील जड वाहतूक आज दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. सभास्थानी कोणालाही काळे झेंडे, अथवा काळे फडके घेऊन येता येणार नाही. एवढेच नाही तर काळे कपडेही परिधान करून येण्यास पोलिसांनी मज्जाव केला आहे.


तसेच काळे कपडे परिधान करून येणाऱ्यांना परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. सभास्थानी जेवणाचे डबे आणि पिण्याच्या पाण्याची बॉटल घेऊन जाण्यासही मज्जाव असणार असून पिण्याच्या पाण्याची सोय सभास्थानी आयोजकांकडूनच केली जाणार आहे. सभा होत असलेल्या ब्रूक बॉण्ड कंपनीच्या परिसरापासून एक किलोमीटरच्या अंतरावर राहणाऱ्या नागरिकांनी 8 तारखेपासूनच त्यांच्याकडे येणाऱ्या मित्र मंडळ आणि पाहुण्यांची माहिती पोलिसांना देण्यात आलीय. 


महत्वाच्या इतर बातम्या