Narayan Rane : अभिनेता सुशांत सिंह हा दिशा सालियनच्या हत्येचा पर्दाफाश करणार होता, म्हणून त्याची हत्या करण्यात आली असल्याचे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. दिशा सालियनचा 8 जूनला बलात्कार करुन हत्या करण्यात आली. सांगितले आत्महत्या केली. मात्र, तिने आत्महत्या केली नव्हती, तर तिची हत्या करण्यात आली असल्याचे राणे म्हणाले. यावेळी तिथे कोणत्या मंत्र्यांची गाडी होती ? असा सवालही यावेळी राणेंनी उपस्थित केला. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी राज्य सरकारसह शिवसेनेवर जोरदर टीका केली.


सुशांतच्या घरातील सावंत नावाचा मुलगा कुठे गेला? तो अद्याप बेपत्ता आहे. तसेच रॉय म्हणायचा मुलगा होता, तो कुठे गेला, तोही अद्याप गायब असल्याचे राणे यावेळी म्हणाले. तसेच दिशा सालियनच्या घरातील वॉचमन कुठे आहे? तो देखील गायब असल्याचे राणे यावेळी म्हणाले. कोण काहीतरी लपवते, हेच यावरुन स्पष्ट होत असल्याचे राणेंनी यावेळी सांगितले. लपवलेल्या गोष्टी बाहेर याव्यात असेही राणे यावेळी म्हणाले.


मी माझ्या जुहूतील केलेल्या घराचे 100 टक्के बांधकाम हे कायदेशीर आहे. मी सगळे कष्टाने मिळवले आहे. आपल्या शेपटावर पाय दिला की मला सहन होत नाही. या घटना मी कधीही विसरणार नसल्याचे राणे म्हणाले. या घरात आम्ही 8 माणसे राहतो. त्यामुळे अधिक बांधकाम करावे असे वाटले नाही. कायदेशीर इमारत असतानाही शिवसेनेकडून म्हणजे मातोश्रीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. सातत्याने तक्रारी करण्यात येत आहे. आम्ही कोणाच्या पोटावर मारले नाही मारणार नाही, घराबद्दल तक्रार करणार नाही. सध्या सुडाचे राजकारण सुरू असल्याच आरोप राणेंनी राज्य सरकारवर केला. 
बाळासाहेबांनी मराठी माणसांसाठी शिवसेना काढली. सध्याचे प्रमुख मराठी माणसाच्या मुळावर आले आहे, असे म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. मातोश्री पार्ट 2 बेकायदेशीर आहे. पैसे भरुन बांधकामाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. माझ्याकडे त्यांच्या दोन्ही घरांचे प्लॅन असल्याचे राणे म्हणाले.


महाराष्ट्रात सध्या शेतकऱ्यांची काय स्थिती आहे. उत्पन्न काय वाढले का? कायदा सुव्यस्था नाही. बेकारी वाढली आहे आणि हे म्हणतात मराठी माणसासाठी शिवसेना. मराठी माणूस मुंबईतून तडीपार झाला आहे. मराठी माणसांसाठी तुम्ही काय केले. उद्योग, रोजगार दिले का? असा सवाल देखील राणेंनी शिवसेनेला केला. हे विकासाचे काहीच बोलत नाहीत. म्हणूनच असे विषय करत असल्याचे राणे यावेळी म्हणाले.