नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपची रणनीती जवळपास निश्चित झाल्याची माहिती असून 30 टक्के उमेदवारही बदलण्यात येणार असल्याची शक्यता आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बुधवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. त्यामध्ये भाजपच्या 110 जागांचा निर्णय अंतिम झाल्याची माहिती आहे. तसेच येत्या शुक्रवारी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. 


भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडली. सुमारे अडीच तास ही बैठक सुरू होती. त्यामध्ये भाजपच्या 105 मतदारसंघांवर आणि समर्थन देणाऱ्या इतर 11 आमदारांच्या जागांवर चर्चा झाली. त्यानंतर जवळपास 110 जागांचा निर्णय अंतिम झाल्याची माहिती आहे. 


या बैठकीनंतर महाराष्ट्र भाजपचे सगळे नेते दिल्लीतून माघारी परतले. देवेंद्र फडणवीस मात्र रात्री दिल्लीतच मुक्कामी राहिले. बैठक संपल्यावर देवेंद्र फडणवीस पुन्हा भाजप मुख्यालयात पोहचले.  


भाजपकडून 110 जागांवर अंतिम निर्णय झाला असून येत्या शुक्रवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामध्ये एकूण 30 टक्के उमेदवार बदलण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


दिल्लीतील नेते मित्रपक्षांशी चर्चा करणार


भाजपचे बहुतांश उमेदवार ठरल्यानंतर आता राज्यातील भाजपच्या नेत्यांची चर्चा संपली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये ज्या जागांवर वाद आहे त्या जागांवर आता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करावी लागणार आहे. 


दरम्यान, राज्यातील महायुतीच्या मित्रपक्षांचीही जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय. शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाने अधिकच्या जागांवर दावा केल्याची माहिती आहे. 


महायुतीकडून रिपोर्ट कार्ड सादर


अडीच वर्षात केलेल्या कामांचं महायुतीकडून आज रिपोर्टकार्ड सादर करण्यात आलं. तीन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीने महायुतीच्या भ्रष्टाचाराचा पंचनामा करणारा रिपोर्ट प्रसिद्ध केला होता. त्याला महायुतीकडून रिपोर्ट कार्डनं उत्तर देण्यात आलं आहे. त्यात विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर देण्यात आलंय. त्यात लाडकी बहीण, शेतकऱ्यांना मोफत वीज, नदीजोड प्रकल्प यासारख्या योजनांचा उल्लेख करण्यात आला आहे. जाहीरनामा काढतात पण रिपोर्ट कार्ड काढायला हिंमत लागते, असा टोला एकनाथ शिंदेंना लगावला. तर हे रिपोर्ट नाही तर डिपोर्ट कार्ड आहे, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.


ही बातमी वाचा: