Marathi Actress : अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade) हिने लोकसभा निवडणुकांदरम्यान साताऱ्याच्या सभेतूनच तुतारी हाती घेतली होती. शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर अश्विनी आता विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षात बरीच सक्रिय झाली आहे. इतकच नव्हे तर तिला आता पक्षात एका महत्त्वाचं पदासाठी नियुक्त देखील करण्यात आलं आहे. नुकतच अश्विनीने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या संदर्भात माहिती दिली.
अश्विनी महागंडे ही स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून घराघरांत पोहचली. तिच्या या मालिकेने तिला बरीच लोकप्रियता देखील मिळवून दिली आहे. त्यानंतर अश्विनीने राजकारणाची वाट धरत शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. त्यातच आता अश्विनीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला काँग्रेस पार्टीत उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आलीये. यासाठी अश्विनीने शरद पवार त्याचप्रमाणे खासदार सुप्रिया सुळे यांचे मनापासून आभार मानले आहेत.
अश्विनीची पोस्ट नेमकी काय?
अश्विनीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं की, माझे वडील स्व. प्रदीपकुमार महांगडे (नाना) यांनी कायम मा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केले. अगदी गावातल्या निवणुकांपासून ते लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळात अगदी झोकून देवून ते काम करायचे. जेवायला बसल्यावर चर्चा सुद्धा त्याच. राजकारण हा त्यांचा आवडता विषय. लोकांच्या मदतीला धावून जाणे हे रक्तातच होते त्याच्या. त्यांना कायम कार्यकर्ता बनून राहायला आवडायचे.पण साधारण 4 वर्षांपूर्वी त्यांना जाणवले की #ताई (मी) समाजासाठी काम करू शकते, त्यांच्यासाठी उभी राहू शकते आणि पक्षाने जबाबदारी दिली तर काम करण्याचा आवाका वाढेल. हे त्यांचे स्वप्न अर्थात 4 वर्षानंतर आज #कोजागिरी_पौर्णिनेच्या मुहूर्तावर पूर्ण झाले. ही नवीन जबाबदारी मला अजून घडवेल. समाजासाठी काम करायची जाणीव सतत करून देईल. स्वीकारलेले काम जबाबदारीने पूर्ण करण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. यात अनेक लोकांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा होत्या म्हणून हे शक्य झाले. त्यांचे आभार..
पुढे तिने म्हटलं की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांनी महाराष्ट्र प्रदेश नॅशनॅलिस्ट महिला काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पार्टीच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली त्याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे. मा. शरदचंद्र जी पवार साहेब, मा. सुप्रियाताई सुळे,मा. जयंत पाटील, मा. अमोल दादा कोल्हे, मा. बाळासाहेब पाटील, मा. शशिकांत शिंदे, मा. मेहबूब शेख तसेच माझ्यावर प्रचंड प्रेम करणारे आमचे मा. प्रसाद काका सुर्वे, मा. डॉ. नितीन सावंत, मा. राजकुमार पाटील, मा. बाबर, मा.संतोष पवार यांची ऋणी आहे.