Amol Kolhe शिर्डी : सध्या शिर्डी (Shirdi) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वतीने कार्यकर्ता शिबीर सुरु आहे. यात गुरुवारी खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकार (Central Gorvernment), राम मंदिराचा मुद्दा (Ram Mandir) आणि राज्य सरकारवर (Maharashtra Government) जोरदार टीका केली.
अमोल कोल्हे म्हणाले की, सध्या राम मंदिराची चर्चा देशात जोरात सुरू आहे. काही राजकीय पक्ष तर ही आमची मक्तेदारीच आहे, असे म्हणत आहेत. मी त्यांना प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, प्रभू श्रीरामचंद्र जेवढे तुमचे आहेत, तेवढेच आमचे आहेत. आमच्या मंदिरातील श्रीरामचंद्र हे धनुष्यबाण ताणलेले नाहीत. तर ते आशीर्वादाचा हात उंचावलेले, माता सीतामाई, बंधू लक्ष्मण आणि हनुमान यांच्यासह कुटुंबवत्सल प्रभू श्रीरामचंद्र आहेत”, असे वक्तव्य खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
अबकी बार चारसो पार हे केवळ मनोधैर्य वाढवण्यासाठी
श्रीरामांनी वनवास पत्करला तो पित्याचा शब्द पाळण्यासाठी, सर्वसामान्य जनता वानरसेना आहे ती रावणाचा वध केल्याशिवाय राहणार नाही. अबकी बार चारसो पार, असे आपण ऐकत आहोत. हे केवळ कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी म्हटले जात आहे. वास्तविक परिस्थिती मात्र वेगळी असल्याचे ते म्हणाले.
अशांना प्रभू श्रीराम कसे पावतील?
राम मंदिराबाबत बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, ग्रामीण भागात माणसाला माणूस भेटला तर राम राम म्हणतो. राम राम म्हटल्याने माणूस जोडला जातो. राम राम म्हणून माणूस जोडणारा देश आम्हाला हवा आहे. प्रभू श्रीरामाविषयी जेव्हा आम्हाला शिकवले जाते, तेव्हा एकवचनी, एकबाणी, एकपत्नी असल्याचे सांगितले जाते. तिसऱ्या विषयावर मी जाहीर बोलणार नाही. पण एकबाणी आणि एकवचनी या तत्त्वांबाबत बोलले पाहीजे. निवडणुकीच्या आधी वचनं द्यायची आणि मग चुनावी जुमला असल्याचं सांगून टाळायचे, अशांना प्रभू श्रीराम कसे पावतील? अशी टीका त्यांनी भाजपवर केली.
कलियुगात पक्ष आणि चिन्हाचे अपहरण
रामायणात सीतामाईचं अपहरण झाले होते, कलियुगात पक्ष आणि चिन्हाचे अपहरण होत आहे, असे मला नारायणगावमधील परिचित व्यक्तीने सांगितले. मी त्यावर त्यांना म्हणालो, नुसते पक्ष आणि चिन्हाचे नाही तर महाराष्ट्राच्या अस्मितेचेही अपहरण झाले आहे, अशी तोफ त्यांनी राज्य सरकारवर डागली.
दिल्लीसमोर मानवर करून बोलण्याची एकाही नेत्याची हिंमत नाही
इतिहासात आपण जेव्हा आपण डोकावतो त्यावेळी शिवाजी महाराज यांच्याशिवाय इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. त्यावेळी प्रत्येकाला आपली वतन वाचवायची होती. त्यामुळे सगळ्यांनी आदिलशहा पुढे मान झुकवल्या होत्या. त्यावेळी केवळ शिवाजी महाराज यांच्याकडे निष्ठावान मावळे होते. इतिहासाची पुनरावत्ती बघा. राज्यातील अनेक प्रकल्प गेले मात्र राज्यांतील एकाही नेत्याला दिल्लीसमोर मानवर करून बोलण्याची हिंमत नाही. कारण त्यांनी माना झुकावल्या आहे.
आपण स्वाभिमानाची लढाई लढत आहोत
आपण लक्षात घ्यायला हवं की, शरद पवार आपल्याकडे आहेत आपण स्वाभिमानाची लढाई लढत आहोत. आपण ही लढाई का लढत आहोत याचं कारण आपल्याकडे आहे. आपल्याकडे ताकद कमी आहे यंत्रणा कमी आहे. मात्र हरकत नाही. नाण्याची दूसरी बाजू लक्षात घ्यायला हवी. आपण जे करु शकतो किंवा निर्णय घेऊ शकतो ते भाजपच्या निवडून आलेल्या खासदारांच्या हातात नाही. सोन्याच्या पिंजऱ्यातील पोपटापेक्षा स्वतंत्र राहणारा फांदीवर बसून गाणारा पोपट महत्त्वाचा असतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Sharad Pawar Speech : अनेक राज्यात भाजप बळकट नाही, तरी 450 जागा येणार कशावर म्हणतात? पवारांचा सवाल