मुंबई : मट्रो कारशेडसाठी आरेतील सुमारे 2 हजार 700 झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक पर्यावरण प्रेमी आणि मुंबईकरांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. आता या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे.


आरेतील झाडे वाचवा असे कॅप्शन देऊन अमित यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अमित यांनी मेट्रो कारशेडला आपला विरोध नसल्याचे म्हटले आहे. आम्हाला विकास हवा, परंतु, पर्यावरणाचा बळी देऊन विकास नको, अशी भूमिका अमित यांनी मांडली आहे

अमित म्हणतात की, चार दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने आरे कॉलनीतील 2700 झाडे तोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाअगोदर महापालिकेचे अधिकारी आणि एमएमआरडीएचे पदाधिकारी यांनी आरेतील स्थानिकांशी चर्चा केली. या चर्चेत 82 हजार स्थानिकांनी वृक्ष तोडीवर आक्षेप घेत तक्रारी केल्या. जर 82 हजार लोकांच्या तक्रारी असतील आणि तरिही झाडे तोडण्याचा निर्णय आपण घेत असू तर संशय निर्माण होणारच. आम्ही विकासाच्या विरोधात नाही. विकास हा नक्कीच व्हावा. परंतु, निसर्गाचा बळी देऊन नाही. आपल्यावर ग्लोबल वॉर्मिंगचे खूप मोठे संकट आहे. हे संकट मुंबई, महाराष्ट्र आणि जगावर आले आहे. सध्या अॅमेझॉनच्या जंगलाला मोठी आग लागली आहे आणि ही आग विझवण्यासाठी संपूर्ण जग एकवटले आहे. याप्रती सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत. हे सर्व चालू असताना मुंबईचा श्वास असणारे आरे आपण नष्ट करायला निघालो आहोत, याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. त्यामुळे या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला आवाहन करतो की, व्यक्त व्हा. मी तुमच्या आणि निसर्गासोबत आहे.

व्हिडीओ पाहा