मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्याच्या निमित्ताने अमित शाह यांनी मुंबई एअरपोर्टवर महायुतीच्या राज्यातील प्रमुख नेत्यांसोबत बैठक केली. या बैठकीत अमित शाह यांच्याकडे भाजपच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही प्रस्ताव ठेवला. तर राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी देखील काही इच्छा व्यक्त केल्याची माहिती समोर आली. 


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मुंबईतील एअरपोर्टवर एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील आगामी निवडणुकीबाबत चर्चा पार पडली. या चर्चेत भाजपच्या वतीने 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 


भाजपच्या वतीने मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव


राज्यात सध्या महायुतीने जागा वाटप सुरु आहे. या जागा वाटपात अनेक ठिकाणी वाद होण्याची शक्यता आहे. कारण सध्या तीनही घटक पक्षातील प्रत्येक उमेदवाराला निवडणुक लढवण्याची इच्छा आहे. परंतु महायुती टिकवायची असेल तर सध्या तरी हे शक्य होणार नसल्याच पाहिला मिळत आहे. त्यामुळेच भाजपच्यावतीने मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची एबीपी माझाला सूत्रांनी माहिती दिली आहे


महायुतीत वाद होतील अशा 60 जागा


महायुतीमध्ये वाद निर्माण होतील अशा प्रामुख्याने जागा पाहिल्या तर यामध्ये इंदापूर, मावळ, अमरावती, वडगाव शेरी अशा प्रमुख जागांचा उल्लेख होतो. कारण याठिकाणी थेट लढत ही भाजप आणि राष्ट्रवादीत पहायला मिळाली होती. एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार महायुतीत वाद निर्माण होतील अशा तब्बल 60 जागा आहेत


वादाच्या जागांवर आठ दिवसात तोडगा काढणार


आगामी काळातील वाद लक्षात घेऊन महायुतीत सामोपचाराची भूमिका घेतली जाईल अशी सध्या तरी परिस्थिती पहायला मिळत आहे. या अनुषंगाने ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, तसेच ज्यांचा आमदार त्याला पुन्हा संधी हे धोरण राहिल अशी भूमिका मांडली आहे. तसेच वाद निर्माण होणाऱ्या जागांवर येत्या 8 दिवसांत तोडगा काढला जाईल असंही सांगितलं आहे


मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव नाही


एकीकडे मैत्रीपूर्ण लढतीचा विषय असताना दुसरीकडे एका इंग्रजी दैनिकाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी थेट अमित शाह यांच्यासोबत वन टू वन झालेल्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बिहार पॅटर्नप्रमाणे मुख्यमंत्री पद द्यावं अशी मागणी केली असल्याचं वृत्त दिलं आहे. यावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अजित पवार यांनी या धांदात खोट्या बातम्या असल्याची प्रतिक्रिया एबीपी माझाशी बोलताना दिली आहे


जागावाटपात सर्वात कमी जागा अजित पवारांच्या वाटेला?


महायुतीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला कमी जागा येणार हे चित्र स्पष्ट आहे. त्यामुळे आपोआपच ज्याच्या जास्त जागा निवडून येतील त्याला मुख्यमंत्री पदाची संधी मिळण्याची शक्यता दाट आहे. जागा वाटपात आणि जागा जिंकून येण्यात भाजप मोठा भाऊ ठरला तर पुन्हा एकदा अजित पवार यांचं मुख्यमंत्री पदी विराजमान होण्याचं स्वप्न अपूर्ण राहू शकत.  त्यामुळेच कदाचित आताच मुख्यमंत्रीपदाचा शब्द घेण्याचा अजित पवारांचा प्रयत्न असावा अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 


ही बातमी वाचा :