रत्नागिरी : कोकणातील समुद्र किनारे पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असतात. उंच उंच नारळी पोफळीच्या बागा आणि त्यात कौलारू घरं. समुद्र किनाऱ्यावर येताच नजरेस पडणारा अथांग समुद्र किनारा आणि खळखळणाऱ्या लाटा. पर्यटकांनी नेहमीच गजबजलेले कोकणातील समुद्र किनारे सध्या लॉकडाऊन, संचारबंदीमुळे ओस पडलेले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, आंजर्ले, गुहागर, केळशी, पाळंदे इत्यादी समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची रेलचेल नेहमीच सुरु असते. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे राज्यात लॉकडाऊनसदृश नियम लागू करण्यात आले आणि त्यात कोकणातील समुद्र किनारे बंद करण्यात आले. त्यातीलच एक दापोलीतील पाळंदे समुद्र किनारा.
दापोली शहरापासून जवळच असलेला हा समुद्रकिनारा. त्यामुळे इथे नेहमीच येणाऱ्या पर्यटकांची रेलचेल मोठ्या प्रमाणात असते. पण सध्या किनाऱ्यावर निरागस शांतता आणि समुद्राच्या वाहणाऱ्या लाटांचा आवाज या किनाऱ्यावर फक्तं ऐकू येतोय. किनाऱ्यावर असलेली हॉटेल्स, दुकानं, टपरी बंद असल्याने सर्वत्रच शुकशुकाट असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या या किनाऱ्यावरील लाटांवर पक्षी भ्रमण करतांनाचे चित्र पहायला मिळत आहे.
कोकणात पहिल्या लॉकडाूनच्या वेळीही पर्यटकांनी अशीच पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं होतं. पण, लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले आणि पुन्हा एकदा कोकण पर्यटकांनी खुलून गेलं होतं. इथल्या स्थानिकांच्या व्यवसायालाही चालना मिळाली होती. पण, पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं आणि ही घडी विस्कटली.
हे चित्र फक्त दापोलीच्या किनाऱ्यावरील आहे अशातला भाग नाही, तर कोकणात सध्या सर्वत्र अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. काही भागांमध्ये सक्तीचा लॉकडाऊन पाळण्यात येत असल्यामुळं तिथं अत्यावश्यक सेवांची दुकानंसुद्धा क्वचितच उघडी दिसत आहेत. त्यामुळं कोकण पट्टयामध्ये सध्या कमालीची शांतता दिसून येत आहे.
मागील काही दिवसांपूर्वी बऱ्याच चाकरमान्यांनी कोकण गाठला आहे. त्यामुळे गावांमध्ये गजबजाट असला तरीही कोकणातील रस्ते, बाजारपेठा आणि समुद्रकिनारे मात्र निर्मनुष्य आहेत. इतकंच नव्हे तर मुंबई- गोवा महामार्गावरही वाहनांची रेलचेल लक्षणीयरित्या कमी झाली आहे. फक्त अत्यावश्यक सेवा वगळता या भागात कोणतीही वाहनं दिसून येत नाहीत. त्यामुळं संचारबंदीच्या नियमांनी कोकणाचं चित्र पुरतं बदललं आहे, असंच म्हणावं लागेल.