Ambernath: अंबरनाथमध्ये इंटरनेटची वायर टाकताना कर्मचारी गंभीररीत्या भाजल्याची दुर्दैवी घटना 4 जानेवारी रोजी घडली होती. हायटेंशन वायरशी संपर्क आल्यानं विजेचा झटका बसून या कर्मचाऱ्याला गंभीर इजा झाली. या कर्मचाऱ्यावर मागील आठ दिवसांपासून एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज अखेर उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झालाय. या घटनंनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरलीय. 


सागर कोळी असं मृताचं नाव आहे. सागर हा 4 जानेवारीला सकाळी अंबरनाथ पश्चिमेच्या नवरे पार्क परिसरातील न्यु हिल व्ह्यू इमारतीत इंटरनेट केबल टाकण्याचं काम करत होता. यावेळी अचानक ही इंटरनेटची केबल बाजूलाच असलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या संपर्कात आली. यामुळं मोठा स्पार्क होऊन टेरेसवर केबल हातात घेऊन उभ्या असलेल्या सागर कोळीला  विजेचा जोरदार झटका बसला. यात गंभीररीत्या भाजलेल्या सागरवर ऐरोलीच्या नॅशनल बर्न सेंटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र अखेर 8 दिवसांनी सागर कोळी याचा दुर्दैवी मृत्यू झालाय.


अंबरनाथ: सरकारी नियम धुडकावत बैलगाडा शर्यती, गुन्हा दाखल
अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीतील बोहोनोली गावाजवळ बुधवारी सकाळी बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं. या शर्यतींची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत आयोजक आणि स्पर्धक तिथून पसार झाले होते. बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठली असली, तरी शर्यती आयोजित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असते. त्यात सध्या कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता राज्यात जमावबंदीचे आदेश लागू आहेत. मात्र हे सगळे नियम धुडकावत शर्यती आयोजित करण्यात आल्यानं शिवाजीनगर पोलिसांनी शर्यतींचे आयोजक किशोर पाटील, शिवा पाटील यांच्यासह 50 ते 60 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. आपत्ती व्यवस्थापन कायदा, प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम, पशू वाहतूक अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम अशा विविध कायद्यान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha