अंबाजोगाई : अंबाजोगाई नगरपालिकेचे नगरसेवक विजय जोगदंड यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्याच भावकीतील सहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास परळी वेस परिसरात त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता.


याप्रकरणी विजय जोगदंड यांचा लहान भाऊ नितीन याने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, दोन वर्षापूर्वी त्याचे आणि भावकीतील एका महिलेचे अनैतिक संबंध होते. या कारणामुळे भगवान दत्तू जोगदंड आणि त्याची मुले नितीनवर चिडून होते.

रात्रीच्या सुमारास नितीन परळी वेस परिसरातील समता नगरमध्ये जाणाऱ्या कमानीजवळ थांबला असताना राज उर्फ रांजन्या भगवान जोगदंड, मनोज उर्फ मन्या भगवान जोगदंड, विजय भगवान जोगदंड, अर्जुन भगवान जोगदंड, मालू भगवान जोगदंड आणि करण भगवान जोगदंड हे सहा सख्खे भाऊ तलवार, गुप्ती आणि कोयता घेऊन तिथे आले. त्यांनी नितीनला शिवीगाळ करत मालूने नितीनवर गुप्तीने वार केला.

दरम्यान, भावाला मारहाण होत असल्याचे माहित झाल्याने नगरसेवक विजय जोगदंड यांनी तिथे धाव घेतली आणि हल्लेखोरांची समजूत घालू लागले. त्याचवेळी राज जोगदंडने तलवारीने आणि करण याने कोयत्याने विजय यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात विजय जोगदंड गंभीर जखमी झाले. यावेळी नितीनने जीवाच्या भीतीने तिथून पळ काढला. विजय जोगदंड रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपीही घटनास्थळाहून पसार झाले.

परिसरातील लोकांनी विजय जोगदंड यांना स्वाराती रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी रात्रीतून दोन आरोपींना ताब्यात घेतले असून चार आरोपी अद्याप फरार आहेत. आरोपींच्या शोधासाठी पाच पथके तयार करण्यात आली आहेत. कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी शहरात प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

विजय जोगदंड हे अंबाजोगाई नगरपालिकेत दोन वर्षापूर्वी भाजपाच्या तिकीटावर निवडून आले होते.