अमरावती : जिल्ह्यातील चिखलदऱ्यात होणाऱ्या जगातील तिसरा आणि भारतातील पहिल्या स्काय वॉकला केंद्राने रेड सिग्नल दिल्याने चिखलदरा येथील स्थानिक चांगलेच संतापले आहेत. वेळ पडली तर चिखलदऱ्यात मोठं आंदोलन करू पण स्काय वॉकचं काम थांबू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. हे सगळं राज्य आणि केंद्राचा वाद आहे, तो त्यांनी त्यांच्या परिने सोडवावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.


केंद्र सरकारने चिखलदरा हा पूर्वीपासून पर्यटनाचे थंड हवेचे ठिकाण आहे. तिथे नवीन स्काय वॉक करायचा असल्यास जैवविविधता आणि परिसंस्थेच्या अभ्यासासोबतच अतिपर्यटनामुळे धोका निर्माण होणार नाही, याचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे केंद्र सरकारने आपल्या पत्रात म्हटले आहे. सोबतच त्या परिसरात घनडाट जंगल असून वन्य प्राण्यांचा अधिवास आणि त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उच्च दर्जाचे संवर्धन व संरक्षणची आवश्यकता आहे. त्यामुळे तिथे पर्यटन नकोय असंही पत्रात म्हटलं आहे. ज्या परिसरात स्काय वॉक बनतोय तो व्याघ्र अधिवासाचा भाग आहे. स्काय वॉकचं अर्ध काम झालं असून आता फक्त काचेचा पूल बनविण्यासाठी केंद्राची परवानगीसाठी राज्य सरकारने वन विभागामार्फत परवानगी मागितली होती. पण केंद्र सरकारने ती परवानगी नाकारली आहे. या स्काय वॉकसाठी 34 कोटी 34 लाख रुपये खर्च होणार आहे. त्यामुळे आता राज्य आणि केंद्र हे पुन्हा आमने-सामने येतील. आता मुख्यमंत्री काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


चिखलदरा येथील हे स्कायवॉक झाल्यास महाराष्ट्राची नव्हे तर संपूर्ण देशाची मान उंचावेल अशी भावना स्थानिकांनी आहे. जर यामध्ये राज्य-केंद्र असा भेदभाव केला तर चिखलदरा हे बंद करू आणि मोठं आंदोलन करू असा इशारा चिखलदरावासीयांना दिला आहे.


स्काय वॉक कसा असणार?
हा स्काय वॉक भारतातील पहिला असून जगातील तिसरा आहे. हा स्काय वॉक पूर्णपणे काचेचा असेल. त्यामुळे आता अमरावतीच्या चिखलदरामध्ये राज्यातूनच नव्हे देश-विदेशातून पर्यटकांची गर्दी वाढेल. मेळघाटच्या चिखलदरातील गोराघाट पॉईंट पासून ते हरीकेन पॉईंटपर्यंत स्काय वॉक 407 मीटरचा हा प्रकल्प 2018 मध्ये प्रस्तावीत करण्यात आला आहे. यासाठी 34.34 कोटी रुपये खर्च होणार आहे. याचे जलद गतीने काम देखील सुरू आहे. दोन मोठ्या टेकड्यांना स्काय वॉकने जोडण्यात येईल. हा स्काय वॉक पूर्णपणे काचेचा असेल. यामुळे पर्यटकांकरिता एक नवे आकर्षण निर्माण होईल.