पालघर : रेल्वे मालघाडी अपघाताच्या दुर्घनटेनंतर 25 तासांनी पहिली लोकल रेल्वे ट्रेन (Loacl train) पालघर स्थानकावर (palghar) आली आहे. पालघर मालगाडी दुर्घटनेच्या 25 तासानंतर डहाणुतून पहिली लोकल ट्रेन मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे. त्यामुळे, गेल्या दिवसभरापासून लोकल ट्रेनची वाट बघणाऱ्या प्रवाशांचा जीव अखेर भांड्यात पडला. आता, या मार्गावरील तुटलेल्या ट्रेनची पटरी बांधून फायनल टेस्टिंग झाल्यानंतर साडे सहानंतर 5.10 वाजताची विरारवरुन डहाणूकडे जाणारी पहिली लोकल ट्रेन पालघर स्थानकात सुरू झाली आहे. तुटलेल्या ट्रेनचे ट्रॅक बांधून फायनल टेस्टिंगला उशीर झाल्याने पहिली लोकल ट्रेन उशिराने धावली. मात्र, गेल्या 24 तासांपासून अनेकांची कामे खोळंबली होती, तर मुंबईकडे (Mumbai) जाण्यासाठी पर्यायी मार्ग किंवा रस्ते मार्ग हा अधिक वेळखाऊ असल्याने सर्वांच्याच नजरा लोकल रेल्वेसेवेकडे लागल्या होत्या. दरम्यान, रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे गुजरातहून (Gujrat) मुंबईकडे आलेल्या एका विद्यार्थीनीस एन्ट्रान्स एक्झामपासून वंचित राहावे लागले. त्यामुळे, माही अग्रवाल व तिच्या वडिलांना खंत व्यक्त केली.  


मंगळवारी संध्याकाळपासून बंद झालेली लोकल सुरु व्हावी म्हणून सर्वच प्रवाशी वाट पाहत होते. त्यातच, संध्याकाळची वेळ झाल्याने मोठ्या संख्येने प्रवाशांची मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी पालघर स्टेशनवर गर्दी झाल्याचं दिसून आलं. पालघर मालगाडी ट्रेन दुर्घटनेमुळे 24 तासापासून पश्चिम मार्गावरील एका लाईनवरील लोकल ट्रेनसेवा ठप्प झाली आहे. मात्र लांब पल्ल्याच्या ट्रेन सुद्धा रद्द करण्यात आल्या होत्या, तर काही ट्रेन धीम्या गतीने सुरू होत्या. रेल्वे प्रशासनाकडून तब्बल 23 तासांपासून मालगाडी ट्रेन बाजूला काढून रेल्वे पटरी ठीक करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू होतं.


200 ते 250 कर्मचाऱ्यांचं युद्धपातळीवर काम


रेल्वे विभागाच्या दोनशे ते अडीचशेपेक्षा जास्त मजूर आणि अधिकारी इंजिनियर यांनी गेल्या 24 तासांपासून अवितरतपणे काम करत रेल्वे प्रवाशांचा मार्ग मोकळा केला आहे. मंगळवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास मालगाडी ट्रेनचे 6 डब्बे रेल्वे रुळावरून खाली घसरले होते. रेल्वेचा या अपघातात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक खांब,पटरी आणि मालगाडी ट्रेनचे नुकसानही झाले आहे. रेल्वे प्रशासनाकडून एक-एक पटरी ठीक करुन एक-एक लांब पाल्यांची गाडी हळूहळू सुरू करण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनानेही मेहनत घेऊन हे काम पूर्णत्वास नेले, युद्धपातळीवर काम करुन पालघर ते मुंबईचा रेल्वे मार्ग सुकर केला. मात्र, लोकल सेवा ठप्प झाल्यामुळे पालघरवासीयांचे मोठे हाल झाले. 


मुलीची एन्ट्रान्स एक्झाम बुडाली


मुंबईकडे जाण्याचा त्यांचा मार्ग बंद झाला होता. या मार्गावरील लोकल ट्रेन बंद असल्यामुळे एका विद्यार्थीनीस परीक्षा सेंटरवर जाणे शक्य न झाल्याने तिची परीक्षा बुडाली. राजेश अग्रवाल हे गुजरातच्या सिल्वासामधून मुलगी माहीच्या एंट्रन्स एक्झामसाठी तिला घेऊन मुंबईला निघाले होते. मुलीच्या बीबीएसाठीच्या एन्ट्रान्स एक्झामचं सेंटर वसईमध्येहोतं, मात्र दुपारी 2.30 वाजता ते पालघर रेल्वे स्टेशन पोहोचल्याने त्यांच्या मुलीला परीक्षाच देता आली नाही. कारण, तिथून वसईला बसने जाण्यासाठी 3 तासांचा अवधी लागत असल्याने ते पालघर स्टेशनवरच बसून होते. आता, राजेश अग्रवाल पालघरमधून गुजरातला जाण्यासाठी ट्रेनची वाट बघत असल्याचं पाहायला मिळालं.