पुणे: आतापर्यंत चैत्र महिन्याची सुरुवातही झाली नाही, तरीही चैत्राचा वैशाख वणवा राज्यभर जाणवतो आहे. राज्यातल्या निम्म्याहून अधिक जिल्ह्यांचं तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर गेलं आहे. तर राहिलेल्या शहरांचं तापमानही 35 ते 40 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.


राज्यात सर्वाधिक 43 अंश सेल्सिअस तापमान रायगड जिल्ह्यातल्या भीरामध्ये नोंदवलं गेलं आहे. तर अकोला जिल्ह्यातही पारा 42 अंशांच्या पुढं गेला आहे. जळगाव, मालेगाव, नाशिक, सांगली आणि सोलापूरमध्येही पारा 40 अंशाच्या पुढं गेला आहे.

रविवारी राज्यातील तब्बल 11 महानगरांमधील तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होते. तर उर्वरित शहरांचे तापमानही 40पेक्षा केवळ एक-दोन अंशाने कमी नोंदविले गेले. त्यामुळे नागरिकांना बऱ्याच उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहे.

प्रमुख शहरांतील तापमान: भिरा (रायगड) ४३, सोलापूर ४०.८, अकोला ४२, अमरावती ४१.२, ब्रह्मपुरी ४१, चंद्रपूर ४२.२, गोंदिया ४१, वर्धा ४२, यवतमाळ ४०, मालेगाव ४१.८, जळगाव ४०.४, नाशिक ३८.४, औरंगाबाद ३८.७, परभणी ३९.९, उस्मानाबाद ३८.९, पुणे ३८.३, कोल्हापूर ३८.२, सांगली ३८.३, सातारा ३८.८, बुलडाणा ३८.७.

2016 वर्ष हे 1991 पासूनचं सर्वात उष्ण वर्ष ठरलं होतं. मागील वर्षी वातावरण बदलामुळे 1600 जणांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी 700 जण उष्णतेच्या लाटेने दगावले. यातील सर्वाधिक 400 जणांचा मृत्यू आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये झाला होता.

भारताच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट असेल, असं शक्यता यंदा वर्तवली जात आहे. यामध्ये पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, उडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राचा समावेश आहे.