रायगड : रायगड मधल्या उरणच्या समुद्रकिनाऱ्यावर एक आगळी वेगळी स्पर्धा भरवण्यात आली. ज्यामध्ये स्केटिंग करण्यासाठी चक्क फळीचा वापर करण्यात येतो.
आजवर तुम्ही बर्फावरच्या स्कीईंगबद्दल ऐकलं असेल पण चिखलातलं स्केटिंग कधी पाहिलं आहे का? उरणच्या समुद्रकिनाऱ्यावर ही फळी स्पर्धा भरवण्यात आली.
एका दीड फुटांच्या फळीवर आपला तोल सावरत दुसऱ्या पायाने चिखल मागे टाकत सगळ्यात आधी समोरच्या झेंड्यांपर्यंत पोहोचायचं अशी ही स्पर्धा.
फक्त फळी स्पर्धा नाही तर पोहोण्याची आणि होड्यांची रेसिंगही घेण्यात आली. या सगळ्या स्पर्धांमध्ये पुरुष मंडळींसोबतच काकू आणि आजीसुद्धा पदर खोचून खेळायला सरसावल्या.
दररोज मासेमारी करताना वापर होणाऱ्या या छोट्याशा फळीचा खेळ गावकऱ्यांनी खूप एन्जॉय केला आणि रोजच्या धावपळीत चार आनंददायी क्षण त्यांच्या गाठीशी बांधले गेले.