मुंबई : निर्बंध शिथील होत असताना केशकर्तनालये आणि ब्युटी पार्लर सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली  असली तरी या व्यवसायास स्थैर्य प्राप्त झालेले नाही. नागरिक केशकर्तनालयात शनिवारी, रविवारी अशा सुट्टीच्या दिवशीच अधिक बाहेर पडत असतात आणि नेमके याच दिवशी सर्व केशकर्तनालये आणि ब्युटी पार्लर बंद ठेवण्याचे निर्देश असल्याने व्यावसायिकांचा अर्थार्जनाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. 


केशकर्तनालये आणि ब्युटी पार्लरच्या व्यवसायात ग्राहकांशी व्यवसायिकांचा थेट संपर्क येत असतो, त्यामुळे मागच्या वर्षी शिथिलीकरणानंतरही परवानगी मिळाली नव्हती. अशात परवानगी मिळाल्यानंतरही वेळेची मर्यादा घालण्यात आली होती. आता पुन्हा दुपारी 4 पर्यंतच मर्यादा असल्यानं ग्राहकांच्या वेळेशी जुळणाऱ्या नसल्याने ग्राहक फिरकत नसल्याची खंत सलून व्यवसायिकांकडून करण्यात येत आहे. सोबतच राज्य सरकारकडून अद्यापही आर्थिक मदत देण्यात आलेली नाही आहे. सरकारने छोट्या व्यापाऱ्यांकरिता मदतीची घोषणा केली होती. मात्र, ती किती जणांना मिळाली असा प्रश्न देखील व्यापाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. 


अत्यावश्यक सेवेतील लोकांना आम्हाला सेवा द्यावी लागते. अशातच या सेवेला अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करण्याची मागणी काही महिन्यांपूर्वी व्यावसायिकांकडून पुराव्यानीशी करण्यात आली होती. मात्र सरकारकडून काही प्रतिसाद येत नसल्याची खंत स्वतंत्र ब्युटी पार्लर कामगार युनियनचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.  सलून व्यवसायिकांकडून अनेक वेळा यासंबंधी मंत्र्यांशी पाठपुरावा करण्यात आला सोबतच निवेदने देखील देण्यात आली मात्र याला प्रतिसाद मिळाला नसल्याचं अनेक सलून व्यवसायिक बोलून दाखवतात. मागील दीड वर्षांपासून व्यवसाय संपूर्णपणे ठप्प होता. अशात आता परवानगी मिळाली असताना देखील अर्थार्जनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी व्यवसाय करण्यासाठी किमान वेळ मिळावा अशी मागणी महाराष्ट्र सलून ब्युटी पार्लर असोसिएशनचे पदाधिकारी आणि सल्लागार उदय टक्के यांनी मागणी केली आहे. 


 स्वतंत्र ब्युटी पार्लर कामगार युनियनचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण म्हणाले,  लॉकडाऊनमुळे बारा बलुतेदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अशातच नाभिकांना देखील अनेक अडचणी आल्यात. त्यामुळे पैसे वाढवून किमान अंगावर चढलेलं कर्ज दूर करण्याचा प्रयत्न केला तर ग्रामीण भागात पैसे वाढवले म्हणून नागरिक मारहाण करतात. अशात नाभिकांनी जगायचं कसं असा प्रश्न आमच्यासमोर आहे. पहिल्या टाळेबंदीत स्थानिक स्वराज्य संस्थेकडून मदत करण्यात आली होती. आता देखील अशीच मदत स्थानिक स्वराज्य संस्थांनी नाभिकांना करावी. सोबतच आमच्या व्यवसायावरील जीएसटी देखील हटवावा. 


सरकारला वेळोवेळी आम्ही मदत केली आहे. टाळेबंदीत असो किंवा आता नियम शिथील केल्यानंतर देखील आम्ही सहकार्य करत आहोत. अशात सध्या दुकानं जरी सुरु असली तरी सोमवार-शुक्रवार दुपारी 4 पर्यंतचीच वेळ असल्याने व्यवसाय होत नसल्याने अर्थार्जनाचा प्रश्न आहे. अशात शनिवार आणि रविवारी सु्ट्टीचा दिवस असल्याने व्यवसायासाठी किमान वेळ मिळावा अशी मागणी महाराष्ट्र सलून ब्युटी पार्लर असोसिएशनचे उदय टक्के यांनी केली आहे.