मोठ्या भावांच्या भांडणात आमचं नुकसान : विनायक मेटे
एबीपी माझा वेब टीम | 18 Jan 2017 04:44 PM (IST)
नाशिक : भाजप आणि शिवसेना या दोघा मोठ्या भावांच्या भांडणात आम्हा छोट्या भावांच कायमच नुकसान झालं आहे. आताही युतीने जागावाटपात आम्हाला गृहित धरलं न धरल्यास शिवसंग्राम पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रासप आगामी निवडणुकांत स्वबळावर उमेदवार उभे करेल, असा इशारा शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिला आहे. विविध कार्यक्रमांसाठी नाशिकमध्ये आले असता विनायक मेटे आणि खासदार राजू शेट्टी यांनी एकत्र पत्रकार परिषदही घेतली. जिथे ताकद आहे तिथे स्वबळावर आणि जिथे कमी ताकद आहे तिथे एकत्र येऊन महाआघाडीतील हे तिन्ही पक्ष निवडणूक लढवतील. किती महापालिका आणि किती जिल्हा परिषदांत एकत्रित निवडणूक लढवायची, याचा निर्णय घेण्यासाठी लवकरच बैठक होणार असल्याचंही मेटे यांनी यावेळी स्पष्ट केलं.