नागपूर : नागपुरात नोटबंदीविरोधात आंदोलन कऱणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार करण्यात आला आहे.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी बॅरिकेट तोडून आरबीआयच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांना थोपवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.
नोटबंदीचा विरोध करण्यासाठी मुंबई आणि नागपूरमध्ये काँग्रेसनं घेराव आंदोलन केलं. नागपुरातल्या आंदोलनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक काँग्रेस नेते सहभागी झाले होते.
दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, विलास मुत्तेमवार यांनी धरणे आंदोलन सुरु केलं आहे. जोपर्यंत लाठीचार्ज करणारे अधिकारी निलंबित केले जात नाही, तोपर्यंत आंदोलन सोडणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
दरम्यान, तिकडे गुजरातमधील अहमदाबादेत नोटाबंदीविरोधातील आंदोलनात, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, शंकरसिंह वाघेला यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.