Christmas and New Year Celebration : राज्य सरकारने मद्यप्रेमींना मोठी आनंदाची बातमी दिली आहे. नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर दारूची दुकाने, बार पहाटेपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य गृह विभागाने परवानगी दिली आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात करता येणार आहे. 


नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 24 ,25 आणि 31 डिसेंबर रोजी मद्य विक्रीची दुकाने, परमिट रुम पहाटे पाच वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्याशिवाय, काही ठिकाणी वाईन शॉप, परदेशी आणि उंची मद्य विक्री करणारी दुकाने ही रात्री 1 वाजेपर्यंत खुली असणार आहेत. त्याशिवाय, पब, बार अॅण्ड रेस्टोरंट्स, बीअर बारदेखील पहाटे पाच वाजेपर्यंत खुली असणार आहेत. 


राज्य सरकारने दिलेल्या या परवानगीमुळे मद्य प्रेमींची थर्टीफस्ट पार्टी दणक्यात साजरी होणार आहे. मद्यप्रेमींना आता 24, 25 आणि 31 डिसेंबर रोजी पहाटे 5 वाजे पर्यंत मद्य विकत घेता येऊ शकणार आहेत. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक जण 31 डिसेंबर रोजी मद्यपान करतात आणि नववर्षाचे स्वागत दणक्यात करण्यासाठी पार्टी करतात. या काळात मद्याची मागणी असते. मद्याच्या विक्रीमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाला आर्थिक फायदा होतो. मद्य विक्रीमुळे राज्याला महसूलही मोठ्या प्रमाणावर मिळतो. त्यामुळे या वेळ वाढवून देण्याच्या निर्णयामुळे सरकारला आर्थिक फायदा होणार आहे. 


तर परवानगी होऊ शकते रद्द.... 


गृह विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, सार्वजनिक शांतता, कायदा आणि सुव्यवस्था यांचा विचार करून जिल्हाधिकारी या वेळेच्या शिथिलतेबाबत निर्णय घेऊ शकतात. याचाच अर्थ जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने वेळेबाबत दिलेली सूट रद्द होऊ शकते.