भंडारा : ज्या प्रमाणे लोकशाहीच्या मार्गानं खासदार आपल्या जागेवर उभे राहून जनतेचे प्रश्न उपस्थित करीत असतांना तुम्ही त्यांना निलंबित करता? असा प्रश्न विचारत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर अनेक मुद्यावरुन टिकास्त्र सोडले आहे. भाजपचे (BJP) पाप लपविण्यासाठी एखादा पिल्लू काढायचा, त्याचा इशू करायचा, हे आजचं नाही.  गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे. लोकशाही संपुष्टात आणायला भाजप निघाली आहे. लोकशाहीचा गळा घोटायला ते निघाले आहे. तुम्ही तर आता साऱ्या दुनियेची मिमिक्री करत आहात. नरेंद्र मोदी  (PM Modi) काय करतायेत? अमित शहा काय करतायेत? भाजपचे नेते काय करतायेत? देशात हिंदू-मुसलमानांमध्ये वाद निर्माण करणे, महाराष्ट्रात मराठा ओबीसी मध्ये वाद निर्माण करणं. या पद्धतीने जी तणाव परिस्थिती तुम्ही निर्माण केली आहे, त्याचं उत्तर पहिले दिलं पाहिजे. या पद्धतीचं सगळं पाप लपविण्यासाठी, प्रकरण दाबण्यासाठी भाजपा निघायली असेल, तरी भाजपाचं हे कुणी ऐकायला तयार नाहीत.


भाजपाची तानाशाही, नरेंद्र मोदी च्या रूपानं या देशात कशी चाललेली आहे, हे सगळ्या जनतेला कळलेलं आहे. त्याच्यामुळे बीजेपीची मिमिक्री होईल अशी परिस्थिती आज देशात निर्माण झाली आहे. असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपला लगावला. संसदेत उपराष्ट्रपतींची मिमिक्री केल्याच्या निषेधार्थ भाजपानं आज राज्यभर आंदोलन केलं, त्यावर नाना पटोले बोलत होते. 


श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण देणारे भाजपवाले कोण? नाना पटोले यांचा सवाल  


शंकराचार्य यांचं कालचे मी विधान ऐकलं. या भाजप वाल्यांचे श्रीराम मंदिराशी काहीचं संबंध नाही. यांचं हिमाचलमध्ये अधिवेशन झालं त्यावेळी सांगितलं की, भाजप यात सहभागी होणार नाही. आम्हीच त्याकाळी कोर्टात गेलो आणि कोर्टानं आमच्या बाजूनं निकाल दिला आणि हे कोण आलेत तिथं. हेच जनतेकडून पैसे वसूल करतात. असं शंकराचार्यांचं स्टेटमेंट आहे. त्यामुळं हे निमंत्रण देणारे कोण? असा प्रश्न नाना पटोले यांनी भाजपला विचारला आहे.  संतांमध्ये सुद्धा भाजपला मोठा विरोध सुरू झाला आहे. त्यामुळे लालकृष्ण अडवाणी असो, मुरली मनोहर जोशी असो.  यांचा अपमान करणं तर यांनी सुरुवातीपासूनच चालू ठेवले असल्याची टीका देखील नाना पटोले यांनी केली. अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांना निमंत्रण दिलं. तर, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी असो की अन्य यांना डावलण्यात आलं यावर नाना पटोले बोलत होते. 


मुख्यमंत्र्यांचे भाषण म्हणजे भाजप आणि आरएसएसची स्क्रिप्ट - नाना पटोले


सरकारला प्रश्न चिघळवायचे आहेत, हेच आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. अधिवेशनाच्या काळातही आम्ही सरकारला सांगितलं की, आपण जे 360 कोटी रुपये मागासवर्गीय आयोगासाठी राखून ठेवले आहेत, पुरवणी मागण्यांमध्ये घेतले आहेत. त्या माध्यमातून जातीय जनगणना राज्यांमध्ये चालू करा. हे सगळे प्रश्न जातीनिहाय जनगणनेच्या माध्यमातून सुटू शकतात. पण, सरकारला ते करायचं नाही. कारण की आरएसएसनं जनगणनेचा विरोध केलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी जे भाषण केले ती भाजप आणि आरएसएसची स्क्रिप्ट असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्यानं मनोज जरांगे यांनी सरकारला आगामी निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. यावर नाना पटोले बोलत होते.


नागपुरातून आवाज गुंजणार 


नागपूर ही बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी आहे. धम्मचक्र प्रवर्तन बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या भूमीवर केलं आहे.  आज देशामध्ये जी काही संविधानिक परिस्थिती संपविण्याची व्यवस्था सुरू झालेली आहे, त्या व्यवस्थेच्या विरोधात तो आवाज स्थापना दिवसाच्या निमित्ताने त्या ठिकाणी पूर्ण देशामध्ये पोहोचविण्याचा काम काँग्रेसच्या माध्यमातून केली जाईल.  मोठ्या संख्येने लाखोच्या घरात  लोक त्या ठिकाणी येतील. असा विश्वास नाना पटोले यांनी नागपूर येथे 28 डिसेंबरच्या विराट सभेसंदर्भात बोलतांना व्यक्त केला.