Anil Deshmukh on Akshay Shinde Encounter : ठाण्यातील बदलापूर घटनेतील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आला. बदलापूर शाळेच्या घटनेशिवाय अन्य दोन गुन्ह्यांमध्ये त्याला ट्रान्झिट रिमांडवर घेण्यासाठी पोलीस तळोजा कारागृहात पोहोचले होते. पोलिसांच्या संरक्षणात आरोपी अक्षय शिंदेनं बंदूक हिसकावून गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळीबार केला. यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. 






अक्षय शिंदे जेवढा दोषी तितकाच शाळा चालक भाजप पदाधिकारी दोषी


दरम्यान, या घटनेतर महाविकास आघाडीमधील सर्वच नेत्यांनी या संपूर्ण घटनाक्रमावर संशय व्यक्त केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुद्धा थेट आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. अनिल देशमुख यांनी आरोपी अक्षय शिंदे जेवढा दोषी होता तितकेच दोषी शाळा चालक भाजप पदाधिकारी देखील आहेत. आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी आणि प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह सेट केले जात असल्याचे म्हटले आहे. 


स्वसंरक्षणाचा हा बनाव विश्वास ठेवण्यासारखा नाही


अनिल देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्याचे वृत्त समजले. स्वसंरक्षणाचा हा बनाव विश्वास ठेवण्यासारखा नाही. दोन्ही हातात बेड्या असलेला माणूस पोलिसांचेही पिस्तूल कसे हिसकाऊ शकतो. सदर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे जेवढा दोषी होता तितकेच दोषी शाळा चालक भाजप पदाधिकारी देखील आहेत. आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी आणि प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह सेट केले जात आहे.


पहिल्यांदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती 


बदलापूर येथील नामांकित शाळेतील दोन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती. ठाणे पोलीस आयुक्तांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या घटनेला दुजोरा दिला आहे. पोलिसांकडून अधिकृत निवेदन येणे बाकी आहे. अक्षय शिंदे याने रिव्हॉल्व्हर हिसकावून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती.


इतर महत्वाच्या बातम्या