मुंबई : राज्यात पुढील 15 दिवसांत आचारसंहिता लागू होणार असून पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकांची (Election) घोषणा होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापुरातील एका कार्यक्रमात सांगितले. तर, मुख्यमंत्र्‍यांनीही विधानसभा निवडणुकांबाबत यापूर्वीच भाष्य केलं आहे. त्यामुळे, आता सर्वच राजकीय पक्षांसह कार्यकर्त्यांनाही निवडणुकांच्या घोषणांचीच उत्सुकता लागून राहिली आहे. दुसरीकडे राजकीय पक्षांनीही निवडणुकांसाठी तयारी सुरू केली असून आघाडी व युतीची मोट बांधायला सुरुवात केली आहे. त्यातच, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Election commision) अधिकाऱ्यांचा मुंबई (Mumbai) दौरा निश्चित झाला असून आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने ते आढावा घेत आहेत. 26 ते 28 सप्टेंबर या तीन दिवसांत दिल्लीतून अधिकारी महाराष्ट्रात येत असून राजकीय पक्षांसह निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांसंमवेत, जिल्हाधिकाऱ्यांसमवेत ते चर्चा करणार आहेत. 


राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच थेट लढत होणार असल्याचे दिसून येते. मात्र, मनसे व वंचित बहुजन आघाडीनेही एकलो चलोचा नारा देत काही उमेदवारांची घोषणाही केली आहे. तसेच, संभाजीराजे छत्रपती आणि आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात तिसरी आघाडी स्थापन झाली आहे. त्यामुळे, राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचे दिसून येते. तर, निवडणूक आयोग व प्रशासकीय यंत्रणाही कामाला लागल्या आहेत.  


आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे अधिकारी 26 ते 28 सप्टेंबर 2024 दरम्यान मुंबई  दौऱ्‍यावर  येणार आहेत. 27 सप्टेंबर रोजी आयोगाच्या अधिकाऱ्यांची विविध राजकीय पक्ष, एसपीएनओ, नोडल अधिकारी आणि सीपीएमएफ यांच्यासोबत निवडणुकीच्या सुरक्षेविषयी सखोल चर्चा होईल. यानंतर अंमलबजावणी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली जाईल. त्याचदिवशी राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत देखील आयोगाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. दरम्यान, 28 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसोबत निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर भारत  निवडणूक आयोगाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात येईल, असे आयोगाच्या पत्रात नमूद केले आहे.


दरम्यान, राज्यातील सर्वच पक्षांचे नेते निवडणुकांच्या तयारीला लागले असून सभा, दौरे आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांमध्ये मिसळत आहेत. जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवारांचा दौरा सुरू आहे. तर देवाभाऊ कार्यक्रमातून देवेंद्र फडणवीस यांचेही दौरे होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना भेटून सरकारच्या योजनांच्या प्रचारात गुंतल्याचे दिसून येते.


हेही वाचा


बाप रे... मुंबईच्या 'लोकल'मध्ये आढळली बेवारस बॅग; बॅगमध्ये 20 लाख कॅश, प्रवाशाचा शोध सुरू