अकोला : बॉल लागल्याच्या वादातून बाप-लेकाने सुरक्षारक्षकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोल्यातील गोरक्षण भागातल्या ओम हाऊसिंग सोसायटीमध्ये हा प्रकार घडला आहे.


बॉल लागला म्हणून वाद घालणाऱ्या सुरक्षारक्षकाला बॅटने मारहाण करुन त्याची हत्या करण्यात आली. शंकर देशमुख असं या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सुरक्षारक्षकाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी गजानन गवारे आणि त्यांचा मुलगा प्रज्योतला अटक केली आहे.

आरोपी गजानन गवारे हे आकाशवाणीत अभियंता असून मुलगा प्रज्योतने नुकतीच बारावीची परीक्षा दिली आहे.
प्रज्योत मित्रांसोबत मैदानावर क्रिकेट खेळत होता. यावेळी शेजारुन जाणाऱ्या शंकर देशमुख यांना बॉल लागला.

मूळचे अमरावती जिल्ह्यातील गावंडगावचे रहिवासी असलेले देशमुख परिसरातील एका इमारतीवर चौकीदारीचं काम करायचे. बॉल लागल्यामुळे शंकर देशमुख ओरडल्याचं प्रज्योतनं वडील गजानन यांना सांगितलं. त्यांनी लगेच शंकर यांना गाठून त्यांच्यावर काठीने प्रहार केला, तर प्रज्योतने डोक्यात बॅट मारलं.

बापलेकाच्या हल्ल्यात शंकर गंभीर जखमी झाले. शनिवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. खदान पोलिसांनी आरोपी बापलेकांना शुक्रवारी रात्रीच अटक केली. विशेष म्हणजे आरोपी सुशिक्षित कुटुंबातील आहेत.

मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अतिवापरानं शाळकरी मुलं अधिक हिंसक होत असल्याचं पोलिसांना वाटतं. त्यामुळे सर्वच पालकांनी मुलांकडे अधिक लक्ष द्यायला हवं, असं आवाहन केलं जात आहे.