अकोला : अकोल्याच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या उत्कृष्ट कामगिरी आणि दर्जाचा देशपातळीवर गौरव झाला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्यावतीने दिला जाणारा ' युनियन होम मिनिस्टर ट्रॉफी' देऊन अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्राचा गौरव करण्यात आला आहे. आधी सुविधांचा अभाव असलेल्या या केंद्राला मागील या तीन वर्षांपासून नंदनवन करण्याचं कार्य येथील अधिकाऱ्यांनी केलं आहे.


केंद्र सरकारनं 2016 पासून पोलीस प्रशिक्षण केंद्रांसाठी 'उत्कृष्ट प्रशिक्षण केंद्र पुरस्कार' सुरू केलाय. या पुरस्कारांची घोषणा नुकतीच पहिल्यांदा करण्यात आलीय. 2016-17 च्या पहिल्याच वर्षाकरीता पश्चिम विभागातून सर्वोत्कृष्ट पोलीस प्रशिक्षण केंद्राचा पुरस्कार अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्राला मिळाला आहे. यासोबतच राज्यातील नाशिक येथील पोलीस अधिकारी प्रशिक्षण केंद्रालासुद्धा पुरस्कार जाहीर झाला आहे. देशातील पाच विभागांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहेय. यामध्ये दिल्ली, हैद्राबाद येथील अंबरपेठ, त्रिपुरा, बिहार येथील नाथनगर पोलीस प्रशिक्षण केंद्रांचा समावेश आहे


दोन लाख रूपये रोख, सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहेय. पुरस्कार देतांना पोलीस प्रशिक्षण केंद्रामधील क्षमता, पायाभुत सुविधा, कवायत मैदान, प्रशिक्षणाचे प्रकार, उत्कृष्ट आंतरवर्ग, बाह्यवर्ग प्रशिक्षण, प्रशिक्षणार्थी यांना शिकविण्याची पध्दत, उत्कृष्ट शिकवणी वर्ग, कॉन्फरन्स हॉल, लायब्ररी, सुसज्ज अशी संगणक लॅब, वेपन हॅन्डलींग, कमांडो, गोळीबार सराव, प्रशिक्षणार्थी यांची वर्तणुक व शिस्त या गोष्टींचा विचार करण्यात आला आहे.