Akola News अकोला : अकोल्यात बियाण्यांच्या मागणीला घेऊन शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. अकोल्यातल्या (Akola News) टिळक रोडवर थेट शेतकऱ्यांनी रास्ता रोको करीत आपला रोष व्यक्त केलाय. जादा उत्पादन देणारे तसेच पसंतीचे कपाशीचे पुरेसे बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. मागील 4 दिवसांपासून शेतकरी (Farmers) पहाटेपासून कृषी केंद्रावर बियाणे खरेदीसाठी रांगा लावत आहेत. मात्र कृषी केंद्र चालकांकडून आज दुकान उघडण्यात न आल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी अखेर आज रास्ता रोको करीत चक्का जाम आंदोलन केले.


संतप्त शेतकऱ्यांनी थेट रस्ताच अडवून धरला 


या हंगामात बी-बियाणे खरेदीला सुरुवात झाली आहे. मात्र यंदा बियाण्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे जिल्हाभरातील अनेक कृषी केंद्रावर शेतकऱ्यांच्या बियाणे खरेदीसाठी पहाटेपासूनच रांगा दिसून येत आहेत. केंद्रावर नंबर लागल्यानंतर केवळ शेतकऱ्यांच्या हाती केवळ दोनच पॅकेट बियाण्याचे मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. सध्या पोलिसांकडून शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. परिणामी परिसरात एकच गोंधळाचे वातावरण निर्माण होऊन काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाल्याचे बघायला मिळाले आहे. 


बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष 


गेल्या काही दिवसापासून अकोला जिल्ह्याच्या कृषी केंद्रावर कापसाचे बियाणे घेण्यासाठी रणरणत्या उन्हात शेतकऱ्यांची मोठी झुंबड लागल्याचे बघायला मिळत आहे. मात्र नंबर लागल्यानंतरही शेतकऱ्यांच्या हाती केवळ 2 किंवा 3 पॅकेटच बियाणे मिळते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. तर कृषी केंद्रात अपुऱ्या सेवासुविधांमुळे शेतकऱ्यांना प्रचंड त्रासही सहन करावा लागतो आहे. या त्रासाला वैतागून अखेर शेतकऱ्यांनी रास्ता रोका आंदोलन केलंय आणि आपला रोष व्यक्त केलाय.


अनेक गावातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर चक्का जाम केलाय. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढली. मात्र शेतकरी कुणालाही जुमानत नसल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात बियाण्यांचा प्रचंड तुटवडा निर्माण करण्यात आला असून काळ्या बाजारात दुप्पट दराने बियाणे मिळत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केलाय. सकाळपासून रांगेत उभं राहावं लागत आहे आणि कूपन मिळाल्यानंतर दुपारपर्यंत तसेच ताटकळत उन्हात रांगेत उभे रहावे लागतंय. मात्र, त्यानंतरही पुरेसे बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा सयंमाचा बांध आता फुटला आहे. 


रणरणत्या उन्हात बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांची झुंबड


अकोला जिल्ह्यात आधीच उष्णतेच्या पाऱ्याने नवा उच्चांक गाठला आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील बहुतांश कृषी केंद्रावर भर ऊन्हात कापसाचे बियाणे घेण्यासाठी कृषी केंद्रावर शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. कापसाचे अजित 155 बियाण्यासाठी जिल्ह्याभरातील कृषी केंद्रांवर शेतकरी पहाटेपासून रांगेत उभे आहे.


कृषी केंद्रावरील अपुऱ्या सेवासुविधांमुळे ऊन आणि पाण्याविना शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. यात युवा शेतकऱ्यांसह ज्येष्ठ शेतकरी वर्ग देखील रांगेमध्ये उभे असल्याचे बघायला मिळाले आहे.  उन्हाचा धोका लक्षात घेता प्रशासनाने याबाबत योग्य त्या सेवा-सुविधा पुरवाव्या आणि आवश्यक तितक्या स्वरूपात बियाणे उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी आता शेतकर्‍यांकडून करण्यात आली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या