Akola News Update : 2001 मध्ये आलेला 'दिल चाहता है' चित्रपट तुम्हाला आठवतो का? या चित्रपटात 'किशोरवयीन' असलेला नायक अक्षय खन्ना वयानं मोठी असलेली नायिका डिंपल कपाडियाच्या प्रेमात पडतो. या प्रेमात पुढे अनेक 'ट्विस्ट' येतात. समाजही त्यांच्या प्रेमाला नावं ठेवतो. अशाच आशयाचे जवळपास सात चित्रपट सत्तरच्या दशकापासून आतापर्यंत 'बॉलीवूड'मध्ये आलेत. यात 1977 मधील राखी आणि ऋषी कपूरची प्रमुख भूमिका असलेला 'दुसरा आदमी', 1996 मध्ये आलेला अक्षय कुमार आणि रेखाचा 'खिलाडीयो का खिलाडी', 2001 मधील अक्षय खन्ना आणि डिंपलचा 'दिल चाहता है', 2002 मध्ये लिना यादव आणि झायेद खानचा आलेला 'लिला', 2009 मध्ये कोंकणा सेन शर्मा आणि रणबीर कपूर अभिनीत 'वेक अप सीद' आणि 2013 मध्ये शिल्पा शुक्ला आणि शादाब कमालचा 'बी.ए.पास' या चित्रपटांचा समावेश आहेय. अकोल्यातही नेमकी एक अशीच घटना घडली आहे.
अकोल्यात नेमकं काय घडलंय? :
'प्रेम हे नेहमी आंधळं असतं', असं नेहमी म्हटलं जातं. यासोबतच 'प्रेमात सारं क्षम्य असतं', असंही म्हटलं जातं. मात्र, हेच प्रेम अकोल्यात एका महिलेसाठी अक्षम्य ठरलं आहे. अन् तिच्या याच अक्षम्य चुकीसाठी तिच्यावर गुन्हा दाखल होऊन तिला गजाआड व्हावं लागलं आहे. अकोल्यात एका 27 वर्षीय महिलेला 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलावरचं प्रेम चांगलंच महागात पडलं आहे. मानवी संवेदना बधिर करणारं हे प्रकरण पाहून अकोला पोलिसही चांगलेच चक्रावून गेले आहेत.
अकोला शहरालगतच्या कुंभारी येथे वैशाली (काल्पनिक नाव) ही 27 वर्षीय महिला राहत होती. पतीसोबत पटत नसल्याने ती बहिणीच्या नऊ वर्षीय मुलीला सोबत घेऊन राहत होती. या मुलीचे आई-वडील मरण पावल्याने तीच गेल्या चार वर्षांपासून या मुलीचा सांभाळ करायची. ती एमआयडीसीमधील एका दालमिलमध्ये काम करीत होती. सहा महिन्यांपूर्वी या दालमीलमध्ये सचिन (काल्पनिक नाव) हा 17 वर्षीय तरूण कामाला लागला. तो शहरातील खदान भागातील किर्तीनगर भागातील रहिवाशी होता. दालमिलमध्ये काम करतांना या दोघांत चांगलीच मैत्री झाली. अन् मैत्रीचं पुढे प्रेमात रूपांतर झालं. वैशाली प्रेमात आपलं आणि सचिनच्या वयातील अंतर विसरून गेली. त्यांच्या नात्यावर कुणालाच संशय नसल्यानं हे प्रेम आणखीनच फुलत गेलं. अन् 31 जानेवारीच्या रात्री हे दोघेही पळून गेले. वैशालीनं आपल्या बहिणीच्या नऊ वर्षीय मुलीलाही एकटंच टाकून दिलं. या दोघांच्या प्रेमाची कुणकुण कुणालाच नव्हती. मुलगा बेपत्ता झाला म्हणून त्याच्या आई-वडिलांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली. तर महिला बेपत्ता झाली म्हणून खदान पोलीस स्टोशनमध्ये तक्रार दाखल झाली.
अन् बिंग फुटलं...
31 जानेवारीला हे दोघेही पळून गेलेत. इकडे मावशी घरी आली नाही म्हणून नऊ वर्षाची चिमुकली सकाळी घरी रडत होती. यावरून घर मालकाने या मुलीला घेत एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. पुढे पोलिसांनी या मुलीला महिला, बाल-कल्याण समितीच्या ताब्यात दिले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत असतांना सचिन अचानक 9 फेब्रुवारी 2022 रोजी घरी आला. त्यानंतर खदान पोलिसांकडून कागदोपत्री कारवाई करून सचिनला आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आलं. त्यानं पोलिसांना हे सारं प्रकरण सांगितलं. पोलिसांनी या महिलेचा शोध घेतला अन तिला ताब्यात घेतलं. प्रेमासाठी आपल्या बहिणीच्या नऊ वर्षीय मुलीला वाऱ्यावर सोडणाऱ्या या महिलेविषयी सर्वांच्याच मनात संतापाची भावना होती.
अखेर हाती पडल्या बेड्या :
या महिलेला प्रेमाच्या कैफात तो मुलगा अल्पवयीन असल्याचाही विसर पडला होता. आपल्यापेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन मुलावर प्रेम करणे या महिलेला चांगलंच महागात पडलं अहे. त्याच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी खदान पोलिस तिच्याविरुद्ध बालसुरक्षा कायदा अर्थातच 'पॉक्सो'नुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या तिला अटक करण्यात आली आहे.