Akola Latest News :  अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालूक्यातील हिवरखेड येथे अक्षरश: अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. डोळ्याने आंधळे असलेल्या पती-पत्नीवर प्राण घातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात दोघे पती-पत्नी गंभीर जखमी झाले. यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थित जखमी पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या हिवरखेड़च्या स्वस्तीक काॅलनीत ही घटना घडली. हे दोघे पती-पत्नी डोळ्याने आंधळे असून त्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. छोट्या मोठ्या कार्यक्रमात गाणी म्हणून कुटुंबाचा उदरनिर्वाह हे दोघे करायचे. कौटुंबिक वादातून या दोघांवर प्राण घातक हल्ला चढवण्यात आल्याची माहिती आहे. 


खुनाच्या घटनेने हिवरखेडमध्ये खळबळ : 


जिल्ह्यातील हिवरखेड येथील स्वस्तीक काॅलनीत टीनाच्या घरात राहणाऱ्या एका दिव्यांग दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला झाला. दिव्यांग पती शांताराम कंडारे (वय ३०) पत्नी सत्यभामा शांताराम कंडारे (वय २८) या दोघांवर त्याच्याच मोठ्या भावाने प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात सत्यभामा कंडारे हिचा मृत्यु झालाय. तर शांताराम कंडारे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती हिवरखेड पोलिसांना मिळतात, आयपीएस अधिकारी रितू खोकर, पोलीस निरीक्षक विजय चव्हाण तेल्हाराचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड यांनी घटनास्थळी भेटी दिल्या. 


मोठ्या भावानेच केला प्राणघात हल्ला : 


  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शांताराम कंडारे याच्याच मोठ्या भावाने या दोघांवर आज रविवारी ११ ते १२ वाजेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरात प्राणघातक हल्ला चढवला. विनोदने कौटुंबिक वादातून हे हत्याकांड केले असल्याचे समजते, आज पाणी सांडण्यावरून या दोघांमध्ये वाद झालाय आणि वादाचं रूपांतर हत्येपर्यंत पोहोचले. शांताराम आणि त्याच्या पत्नीवर हल्ला केल्यानंतर विनोद हा घटनास्थळावरून पसार झालाय सोबत त्याच्या आईनेही पळ काढला. मात्र, पोलिसांनी सापळा रचून यांना ताब्यात घेतलं आहे. आता त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.


दोघे पती-पत्नी आंधळे : 


शांताराम आणि त्यांची पत्नी सत्यभामा हे दिव्यांग असून डोळ्याने आंधळे आहेत, छोट्या मोठ्या कार्यक्रमात गाणी म्हणून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करत असायचे. त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती अतिशय बिकट होती. शासनाच्या निधीतून मिळणारा दरमहा अपंग निधी यातून त्यांना हातभार मिळत आहे. दरम्यान, आज मृत्यूमुखी पडलेली सत्यभामा ही गर्भवती असल्याचे समजते.